Dr Munde suicide case protest : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज सकाळी फलटणमध्ये दाखल झाल्या आहेत. फलटण परिसरातील शिवसैनिकांनी आज फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तपास प्रक्रियेत झालेल्या निष्काळजीपणा आणि राजकीय हस्तक्षेपाचा त्यांनी आरोप करत पीडित डॉक्टरला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून अंधारे यांच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेची जोरदार चर्चा रंगली आहे.











