Counting of votes on December 21 : आज राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले आहे. मात्र, या निवडणूकीसंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट आता समोर आली आहे. उद्या होणारी मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे हा सर्वांसाठी मोठा दणका मानला जात आहे. राज्यात एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होत असले तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक न्यायालयीन कचाट्यात अडकल्या आहेत. 24 अध्यक्ष आणि 154 सदस्य पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. अशातच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. उद्या होणारी मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या..
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्याविरोधात अनेक उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आज या ठिकाणी मतदान होणार नाही.
हेही वाचा – राज्यात निवडणुकांना सुरुवात; सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा नागरिकांना निवडणूक आयोगाचे आवाहन
न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही
दरम्यान सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होईल. त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.
निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमाला न्यायालयात आव्हान
राज्य निवडणूक आयोगाने जो सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याविरोधात देखील अनेक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आणि मुंबईतही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांनी या सुधारीत निवडणूक कार्यक्रमाला आव्हान दिले दिले आहे. त्यामुळे आता या निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निकाल लांबणीवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
जवळपास 25 ते 30 वर्ष त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे, पण असं पहिल्यांदा घडतंय, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्यांचे निकाल पुढे चाललेले आहेत, मला असं वाटतं की एकूणच ही जी काही पद्धती आहे ही पद्धत फार योग्य वाटत नाही, अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सर्वांना मान्य करावे लागेल, निवडणूक आयोग देखील स्वायत्त आहे, पण यातून जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांचा एक प्रकारे भ्रमनिरास झालेला आहे, आणि सिस्टीमच्या फेल्युअरमुळे त्यांची काही चूक नसताना अशा पद्धतीने काही गोष्टी होण्या योग्य नाहीत, मला वाटतं अजून फार निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत, या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुका मध्ये असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.












