Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी भाजपचा बिनविरोध पॅटर्न सुरू, एका जिल्ह्यात ८ उमेदवार विजयी
Top News

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी भाजपचा बिनविरोध पॅटर्न सुरू, एका जिल्ह्यात ८ उमेदवार विजयी

BJP Unopposed Election Pattern
107

BJP Unopposed Election Pattern : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपचा बिनविरोध पॅटर्न सुरू आहे. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ उमेदवार विजयी झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणखीन ३ दिवस बाकी आहेत. त्यामुळे येत्या ३ दिवसात किती उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध होतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात सध्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून ७ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांच्या उमेदवारांची विजय घौडदौड सुरू आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २१ तारखेला संपली आहे. आता २७ जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार अर्ज माघार घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आतापर्यंत भाजपचे ८ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, कणकवली पंचायत समिती आणि देवगड पंचायत समितीतील हे उमेदवार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या रणनीतीमुळे हे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.

हेही वाचा – “मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करु;” इम्तियाज जलील यांचे वादग्रस्त वक्तव्य

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत बिनविरोध झालेले उमेदवार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत खारेपाटण गटातील उमेदवार प्राची इस्वालकर (भाजप), बांदा गटातील उमेदवार प्रमोद कामत (भाजप), पडेल गटातील उमेदवार सुयोगी रविंद्र घाडी (भाजप) बापर्डे गटातील उमेदवार अवनी अमोल तेली (भाजप) जाणवली गटातील उमेदवार रुहिता राजेश तांबे (शिवसेना) हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्वांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे भाजपला मोठा फायदा झाला आहे.

पंचायत समितीतही अनेक उमेदवारांची माघार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपचे काही सदस्य बिनविरोध झाले आहेत. वरवडे पंचायत समितीत भाजपचे सोनू सावंत बिनविरोध निवडून आले आहेत. वरवडे पंचायत समितीमध्ये सुरुवातीला तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र ठाकरे गटाचे सुधीर सावंत आणि मनसेचे शांताराम साधे यांनी माघार घेतल्यामुळे एकमेव उमेदवार म्हणून सोनू सावंत यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ते बिनविरोध झाले आहेत.

बिनविरोध उमेदवारांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

देवगड तालुक्यातील पडेल पंचायत समितीत भाजपचे अंकुश यशवंत ठुकरूल, नाडण पंचायत समितीत भाजपचे गणेश सदाशिव राणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच बापर्डे पंचायत समितीत भाजपच्या संजना संजय लाड याही बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामुळे अलिकडेच पार पडलेल्या महानगर पालिकेप्रमाणे यावेळीही भाजपने बिनविरोध पॅटर्न राबविल्याचे दिसत आहे. 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख असल्यामुळे अजूनही काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts