Pakistan Beat Netherlands : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक आजपासून सुरु झाला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्स आणि पाकिस्तान क्रिकेट संघ कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये एकमेकांसमोर आले. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या नेदरलँड्सनं 19.5 षटकांत सर्वबाद 147 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्ताननं 19.3 षटकांत 7 गड्याच्या मोबदल्यात ते साध्य केलं. पाकिस्तानसाठी फहीम अशरफने सामना जिंकून देणारी खेळी केली.
कर्णधारानं केल्या सर्वाधिक धावा :
नेदरलँड्सच्या सलामीवीरांनी या सामन्यात संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 28 धावा जोडल्या. त्यानंतर त्यांच्या संघानं नियमित अंतराने विकेट गमावल्या. संघाकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं सर्वाधिक 37 धावा केल्या. तर बास डी लीडेनं 30 आणि कॉलिन अॅकरमननं 20 धावा केल्या. संघाकडून कोणत्याही फलंदाजानं अर्धशतक झळकावलं नाही. सलमान मिर्झानं पाकिस्तानकडून सर्वाधिक 3 गडी बाद केले.
हारता हारता पाकिस्तानचा विजय :
लक्ष्याचा पाठलाग करताना, पाकिस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 27 धावा जोडल्या. यात सॅम अयुब 24 धावा काढून आउट झाला. त्यानंतर आलेला कर्णधार सलमान अली आगाही स्वतात बाद झाला. साहिबजादा फरहाननं चांगली फलंदाजी केली, परंतु अर्धशतकापासून तो वंचित राहिला, त्यानं 31 चेंडूत 47 धावा केल्या. त्याच्या बाद झाल्यानंतर, पाकिस्ताननं पुढील दोन विकेट लागोपाठ गमावल्या आणि निम्मा संघ 100 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, शेवटच्या दोन षटकांमध्ये फहीम अशरफच्या शानदार फलंदाजीमुळं संघाला अब्रु राखत विजय मिळवता आला, त्यानं 11 चेंडूत 29 धावा केल्या.
नेदरलँड्सवर पाकिस्तानचं वर्चस्व :
या विश्वचषकासाठी पाकिस्तान आणि नेदरलँड्स गट-अ मध्ये आहेत. भारत, अमेरिका आणि नामिबिया देखील या गटाचा भाग आहेत. पाकिस्ताननं टी-20 स्वरुपात नेदरलँड्सवर वर्चस्व गाजवलं आहे. या स्वरुपात दोन्ही संघांमध्ये एकूण तीन सामने खेळले गेले आहेत, ज्यात पाकिस्ताननं तिन्ही सामने जिंकले आहेत.










