DGCA big decision : दादांचा अपघात झाला आणि राज्याला आपला लाडका दादा गमावल्यानं एक मोठा धक्का बसला. पवार कुटुंब दु:खात होतं. राष्ट्रनवादीचे नेते दु:खात होते. मात्र, या सगळ्यात आपला हुंदका गिळून एक व्यक्ती मात्र कायम या अपघातावरून प्रश्न विचारत होती, नेटानं लढत होती, ती व्यक्ती म्हणजे दादांचा लाडका पुतण्या आमदार रोहित पवार. त्यांनी पुराव्यासह प्रझेंटेशन सादर करत आरोपांचं रान पेटवलं आणि त्यामुळेच आता नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासणीनंतर DGCA ने VSR व्हेंचअर्सला मोठा दणका दिला असून, कंपनीच्या ताफ्यातील चार ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) विमानांच्या उड्डाणांवर तत्काळ बंदी घातली आहे. विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या विशेष ऑडिटमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे रोहित पवार लढले अन् संपूर्ण जरी नसले तरी काही प्रमाणत ते जिंकले आहेत.
हेही वाचा – बारामती कोणाची? दादांचा वारसा सुनेत्रा पवार चालवणार की, आणखी दुसरे कोण पुढे येणार..
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संबंधित विमान कंपनी आणि त्यांच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर DGCA कडून या विमानांचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्यात आले. या तपासणीमध्ये विमानांच्या देखभालीत आणि तांत्रिक बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. ‘एअरवर्दीनेस’ म्हणजेच उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे आणि कायदेशीर प्रक्रियांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, या विमानांनी प्रवासादरम्यान पाळल्या जाणाऱ्या आवश्यक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले आहे.
विमाने मूळची अमेरिकेतील असून तिथे ती अनेक वर्षे वापरली गेली
यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी ‘लिअरजेट’ विमानांच्या तांत्रिक स्थितीबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या. रोहित पवार यांनी म्हटले होते की, ही विमाने मूळची अमेरिकेतील असून तिथे ती अनेक वर्षे वापरली गेली होती. जुनी झालेली ही विमाने त्यानंतर भारतात आणली गेली. या विमानांच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता DGCA च्या अहवालात त्रुटी आढळल्याने रोहित पवारांचे दावे खरे ठरले आहेत.
राजकीय दबावाची तमा न बाळगता रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले
या संपूर्ण प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले होते. अपघाताच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी केवळ शोक व्यक्त न करता, यामागील तांत्रिक कारणांचा छडा लावण्याचा चंग बांधला होता. लिअरजेट विमानांच्या सुरक्षेबाबत त्यांनी केवळ शंकाच उपस्थित केल्या नाहीत, तर या विमानांचा अमेरिकेतील जुना इतिहास आणि त्यांच्या देखभाल प्रक्रियेतील त्रुटी पुराव्यांसह मांडल्या. राजकीय दबावाची तमा न बाळगता रोहित पवारांनी या कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आज DGCA ने घेतलेला हा कठोर निर्णय, रोहित पवार यांनी नेटाने लढलेल्या या लढाईचा आणि त्यांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्द्यांचा मोठा विजय आहे.
VSR व्हेंचअर्सच्या बाबतीत या प्रक्रियेत अनियमितता दिसून आली
विमान उड्डाणापूर्वी प्रत्येक विमानाला ‘एअरवर्दीनेस सर्टिफिकेट’ मिळवणे अनिवार्य असते. मात्र, VSR व्हेंचअर्सच्या बाबतीत या प्रक्रियेत अनियमितता दिसून आली आहे. या कारवाईमुळे खासगी विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या फिटनेसबाबत आता अधिक कडक नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई म्हणजे यंत्रणेला उशिरा आलेली जाग
अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याचा अपघातात मृत्यू होणे ही राज्यासाठी मोठी हानी होती. या घटनेनंतर झालेली ही कारवाई म्हणजे यंत्रणेला उशिरा आलेली जाग असल्याची टीका होत आहे. अनेक अपघात झाल्यानंतर चौकशी समिती नेमल्या जातात, त्याचे अहवाल अनेक महिन्यांनी येतात, मग त्या अहवालाच काय होतं हे आजपर्यंत कुणाला उमगलं नाही. पण असे अपघात टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणं गरजेचं आहे, अजितदादांच्या विमान अपघातानंतरही चौकशी समित्यांचं हे शेपूट लांबतच गेलं असतं, मात्र रोहित पवार यावरून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत होते, व्हीएसआरला धारेवर धरत होते, त्यामुळे किमान हा अहवाल वेळेत आला. आता या चौकशांमधून आणखी काय काय समोर येणार? याकडे देशाचे डोळे लागले आहेत.












