IND vs NZ T20 WC Final : आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज आहे तर न्यूझीलंडचा संघ आपलं पहिलं विहिलं विजेते पद जिंकण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सर्वांच्या जिव्हारी लागणारं स्टेटमेंट दिलंय. त्याला समजेल अशाच कडक शब्दात भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवने प्रतिउत्तर दिलंय.
पत्रकार परिषदेत न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरने पॅट कमिन्सच्या 2023 मधल्या गाजलेल्या वाक्याची आठवण करुन दिली. अहमदाबादमधल्या 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांना शांत ठेवण्याचं आमचं लक्ष्य असेल, असं सँटनर म्हणाला. जेव्हा सूर्युकमार यादवला सँटनरच्या प्रेक्षकांना शांत बसवण्याच्या कमेंटबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्याने मस्करीच्या अंदाजात उत्तर दिलं. ‘सगळे सारखीच लाईन चिटकवत आहेत. काहीतरी नवीन बोला’. ‘टीममधलं वातावरण खूप रिलॅक्स आहे. मायभूमीत इतक्या शानदार टीमचं नेतृत्व करणं ही एक खास बाब आहे’ असं सूर्या म्हणाला.
आम्ही भारतात वर्ल्ड कप फायनल खेळतोय
“फायनलचा दबाव असेल पण या मोठ्या स्टेजचा आनंद घ्यायचा आहे. एक लीडर म्हणून दबाव असेल. मी हे नाकारणार नाही. निश्चितपणे अतिरिक्त दबाव आणि उत्साह दोन्ही आहे. कारण आम्ही भारतात वर्ल्ड कप फायनल खेळतोय” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
ते चांगलं क्रिकेट खेळतायत आणि आम्ही सुद्धा
भारताने बरोबर या वर्ल्ड कप आधी न्यूझीलंडला द्विपक्षीय मालिकेत 4-1 ने हरवलं होतं. टीव्हीवर मी न्यूझीलंडचे वर्ल्ड कप सामने बघितलेले नाहीत हे सूर्याने मान्य केलं. पण प्रतिस्पर्धी टीमच्या क्षमतेची पूर्णपणे कल्पना आहे. “मी टीव्हीवर त्यांचे टी20 वर्ल्ड कप मॅचेस बघितलेल्या नाहीत. आम्ही अलीकडेच त्यांच्याविरुद्ध खेळलोय. जवळपास ही तीच टीम आहे, ज्यांचा आम्ही सामना केलाय. ते चांगलं क्रिकेट खेळतायत आणि आम्ही सुद्धा. त्यामुळे निश्चित एक चांगला सामना होईल” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये येण्याचं हे सलग दुसरं वर्ष
भारत आणि न्यूझीलंड मर्यादीत षटकाच्या आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये येण्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. मागच्यावर्षी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने त्यांना हरवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.






