Lok Sabha Update : संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला
८ विरोधी खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा संसदेत आज सोमवारी चांगलाच तापला. या विषयावरून काँग्रेसकडून जोरदार हंगामा करण्यात आला. या खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करण्यात आली. संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आमचे ८ सदस्य निलंबित करण्यात आले. त्याना बाहेर बसवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी वेणुगोपाल यांनी केली. दरम्यान यावर उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, आपण वरिष्ठ सदस्य आहात. सभागृहाने घेतलेल्या निर्णयांवर सभागृहाच्या आत चर्चा होत नाही.”
का करण्यात आले होते निलंबन?
अर्थसंकल्पीय सत्राच्या पहिल्या टप्प्यात ३ फेब्रुवारी रोजी सभागृहात आसनाकडे कागद फेकल्याने सभागृहाचा अपमान झाला असे सांगण्यात आले. या प्रकरणी विरोधी पक्षातील आठ खासदारांना अर्थसंकल्पीय सत्राच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते.
या खासदारांना करण्यात आले होते निलंबित
निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे माणिकम टागोर, गुरुजीतसिंग औजाला, अमरसिंग राजा वाडींग, हिबी हिडन, डीन कुरिकोस, प्रशांत पडोळे, किरण कुमार रेड्डी तसेच मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्षाचे एस. वेंकटेशन यांचा समावेश आहे.
हेही वाचा: Health Scheme Enforcement: GBS रुग्णांकडून शुल्क घेतल्यास थेट एफआयआर; आरोग्य मंत्री आबिटकरांचा इशारा
प्रश्न कालावधी पूर्ण
अर्थसंकल्पीय सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात विविध मुद्द्यांवर विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले नाहीत. परंतु आज प्रश्नाचा कालावधी पूर्ण करण्यात आला. सभागृहाची बैठक सुरू होताच काँग्रेसच्या काही सदस्यांनी आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नकाल संपल्यानंतर त्यांना बोलण्याची संधी दिली जाईल असे काँग्रेसच्या खासदारांना बजावले.
एलपीजी तुटवड्यासह अनेक मुद्द्यांवर गोंधळाचे वातावरण
विरोधी पक्षांनी पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे देशात एलपीजी गॅसची कथित कमतरता असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावेळी घोषणाबाजी झाल्यामुळे यापूर्वी प्रश्नकालाची कार्यवाही सुरु झाली नव्हती.
ओम बिर्लांकडून चिंता व्यक्त
काही खासदारांकडून सभागृहात बॅनर, फलक आणि पोस्टर दाखवणे तसेच आक्षेपार्ह भाषा वापरणे याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी “गंभीर चिंता” व्यक्त केली. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपल्या सदस्यांमध्ये शिस्त आणि उच्च नैतिक आचरण राखण्याची विनंतीही त्यांनी केली.










