Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर नव्या चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषदच्या निकालानंतर राजकीय समीकरांवर नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चला तर जाणून घेऊयात कोणते.
विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी काही राजकीय निरीक्षकांच्या मते हा निर्णय यापूर्वीच निश्चित झाला असावा.
हेही वाचा: चहापानावर बहिष्कार, सभागृहात हल्लाबोल; पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारची वाढणार डोकेदुखी?
पक्षाला मोठा धक्का
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला. या घडामोडींची चाहूल लागताच पक्ष नेतृत्वाने बैठक बोलावली होती. मात्र संबंधित खासदार प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाइन सहभागी झाल्याचे समोर आले. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यकर्त्यांच्या बैठका
ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या मतदान आणि निकालाचा अभ्यास केल्यानंतर काही राजकीय वर्तुळांमध्ये मतांच्या संभाव्य विभाजनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे बसवराज पाटील विजयी
धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील विजयी झाले, तर काँग्रेसचे महेश देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला. निकालानंतर मतांच्या गणितावरून महाविकास आघाडीतील काही मते अपेक्षित दिशेने न गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीला फटका बसल्याची चर्चा रंगली आहे.
मतदान कधी झाले?
विशेष म्हणजे, मतदान प्रक्रिया 18 जून रोजी पार पडली होती. त्यामुळे निंबाळकर यांच्या नंतरच्या राजकीय निर्णयाचा आणि निवडणुकीतील मतदानाच्या पद्धतीचा काही संबंध होता का, यावर राजकीय विश्लेषकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही.
ओमराजे निंबाळकरांचा निर्णय
ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला राजकीय स्तरावर धक्का बसल्याचे मानले जात आहे.








