Sri Lankan Navy arrests seven Indian fishermen : बेकायदेशीर मच्छीमारी केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकन नौदलाने तमिळनाडूतील रामेश्वरम (Rameswaram in Tamil Nadu) येथील सात मच्छीमारांना (Seven Fishermen) गुरुवारी अटक केली. दोन यांत्रिक ट्रॉलर नौकाही (Mechanical trawler boat) जप्त करण्यात आल्या. बुधवारी (25 मार्च 2026) रामेश्वरम मत्स्य उतराई केंद्रातून (Rameswaram Fish Landing Centre) 365 टोकन जारी करण्यात आले होते. श्रीलंकेच्या नौदलाने नेडुंथीवू बेटाजवळ (Neduntheevu Island) मासेमारी करत असताना सिम्सन आणि ससिकुमार (Simson and Sasikumar) यांच्या मालकीच्या दोन बोटी ताब्यात घेतल्या, ज्यामध्ये सात मच्छीमार होते, असे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा: इंधन तुटवड्यावर… जग टाळेबंदीच्या उंबरठयावर?
मच्छीमारांची प्राथमिक चौकशी
दरम्यान, त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्या चौकशीनंतर त्यांना श्रीलंकेतील एका नौदल बंदरात नेण्यात आले. ही बातमी रामनाथपुरम येथे पोहोचताच, थंगाचिमडम येथील मच्छीमारांनी कार्ल मार्क्स पुतळ्याजवळ आंदोलन केले. त्यांनी श्रीलंका सरकारविरोधात घोषणा देत वारंवार होणाऱ्या अटक प्रकरणांचा निषेध केला आणि मच्छीमारांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली.
90 टक्के लोक मासेमारीवर अवलंबून
द हिंदूशी बोलताना मच्छीमार नेते जेसु राजा म्हणाले की, गेल्या चार दशकांपासून आम्ही या समस्येचा सामना करत आहोत. “आमच्याकडे मासेमारीशिवाय दुसरा कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही. जवळपास 90 टक्के कुटुंबे यावर अवलंबून आहेत. सरकारांनी मदत केली नाही आणि या समस्येचे कायमस्वरूपी समाधान केले नाही, तर आमच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
पारंपरिक मासेमारी करण्यासाठी परवानगी द्या
सरकारांनी पाल्क उपसागरात पारंपरिकपणे मासेमारी करण्यासाठी परवानगी मिळवून द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. मच्छीमारांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले असून, मासे निर्यातीमुळे व्यापाऱ्यांना नफा मिळतो तसेच देशाला परकीय चलनही मिळते, असे त्यांनी नमूद केले.
अनेक मच्छीमार बेरोजगार
दुसरे मच्छीमार सहायम म्हणाले की, भारत सरकार श्रीलंकेला मैत्रीपूर्ण देश म्हणत असेल, तर तमिळनाडूतील मच्छीमारांच्या अटक प्रकरणांना त्यांनी थांबवायला नको का? बोटी जप्त करणे आणि मोठे दंड लावणे यामुळे कर्जाचा बोजा वाढतो आणि अनेक मच्छीमार बेरोजगार होतात, कारण त्यांच्या बोटी श्रीलंकेतच पडून आहेत.
2018 पासून 180 पेक्षा अधिक ट्रॉलर जप्त
प्रत्येक यांत्रिक ट्रॉलरची किंमत सुमारे ₹40 लाख आहे आणि 2018 पासून 180 पेक्षा अधिक ट्रॉलर जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे 50 टक्के बोटी अजूनही कार्यक्षम आहेत. उर्वरित बोटी कदाचित निकामी होऊन फक्त स्क्रॅप म्हणून उरल्या असतील, असे त्यांनी सांगितले.






