Vijaypat Singhania Passes Away | भारतीय उद्योगजगताला मोठा धक्का बसला आहे. रेमंड (Raymond) ब्रँडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांचं निधन झालं आहे. वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर नेणारे आणि रेमंड ब्रँडला घराघरात पोहोचवणारे विजयपत सिंघानिया यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानं उद्योगजगतात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा – भोंदूबाबा अशोक खरातचा खेळ संपला; ऑफिसमध्ये सापडल्या धक्कादायक वस्तू, आज कोर्टात होणार निर्णायक सुनावणी
रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया काळाच्या पडद्याआड
रेमंड ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आणि विजयपत सिंघानिया यांचे चिरंजीव गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी एक्सवर याबाबतची माहिती देत शोक व्यक्त केला आहे. सिंघानिया यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आज 29 मार्च 2026 रोजी मुंबईतील मलबार हिल येथील हवेली निवासस्थानी दुपारी 1.30 वाजता विजयपत सिंघानिया यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.00 वाजता चंदनवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर सिंघानिया यांच्या निधनानंतर संपूर्ण उद्योगजगतातून शोक व्यक्त केला जात आहे.
विजयपत सिंघानिया यांना भारत सरकारने देशाच्या औद्योगिक आणि साहसी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सिंघानिया यांनी 1980 साली रेमंड ग्रुपची धुरा सांभाळली होती. तर 2000 सालापर्यंत ते रेमंड ग्रुपच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते.
विजयपत सिंघानिया यांना भारतीय हवाई दलाने केलेले सन्मानित
विजयपत सिंघानिया यांनी रेमंडला ‘द कम्प्लीट मॅन’ या टॅगलाईनसह एक प्रिमियम लाइफस्टाइल ब्रँड बनवले आहे. यामुळे भारतीय कापड उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आहे. विजयपत सिंघानिया हे फक्त एक यशस्वी उद्योजगच नव्हते तर एक उत्कृष्ट वैमानिक देखील होते. त्यांनी 2005 मध्ये हॉट एअर बलूनमधील तब्बल 21,000 मीटरपेक्षा जास्त उंची गाठून जागतिक विक्रम केला होता. तर भारतीय हवाई दलाने सिंघानिया यांच्या विमानचालन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना 1994 मध्ये मानद एअर कमोडोर ही पदवी देऊन सन्मानित केले होते.
दरम्यान, विजयपत सिंघानिया यांनी आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात 37 टक्के हिस्सा मुलगा गौतम यांच्या नावावर केला होता. त्यानंतर विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यात मालमत्तेवरून कायदेशीर वाद निर्माण झाला होता. मात्र, काही काळानंतर हा वाद सामोपचाराने मिटला होता. यावरून सिंघानिया काही काळ चर्चेत राहिले होते.






