Rohit Pawar | नाशिकचा (Nashik) भोंदुबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. खरातला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. तर आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अशोक खरातबाबत खळबळजनक दावा केला आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एका बड्या नेत्याच्या फोटोंवर फुली मारून जादूटोणा केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा – भारताला मोठा दिलासा! 3 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर LPG टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी
रोहित पवारांनी नेमका काय केला दावा?
रोहित पवारांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्ष करून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणं गरजेचं आहे, असं रोहित पवार म्हणाले.
जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 31, 2026
पुढे ते म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत.
खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत, असं रोहित पवार म्हणाले.
अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय, असंही रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांनी केलेल्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.












