Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • का हो पवार साहेब… लेकीचं तोंडभर कौतुक, सूनेचं तोंडून नावही नाही!
Top News

का हो पवार साहेब… लेकीचं तोंडभर कौतुक, सूनेचं तोंडून नावही नाही!

Pawar daughter vs daughter in law remark

Pawar daughter vs daughter in law remark : पवार साहेब (Sharad Pawar), तुम्ही वयानं, अनुभवानं खूप खूप मोठे आहात, राजकारणातले तर ‘भीष्म पितामह’ म्हणून सारा देश मानतो तुम्हाला! तुम्ही महिलांना मिळवून दिलेलं सामाजिक, राजकीय स्थान तर कधीच कुणी विसरू शकणार नाही… पण महिलांविषयी कायम आदरभाव जपणारे तुम्ही… कुटुंबातल्या (Supriya Sule) लेकी-सुनेचा विषय (Sunetra Pawar) आल्यावर मात्र तुम्हाला काय होतं कुणास ठाऊक? तिथं का येतो तुमच्या मनी दुजाभाव?

आता कालचंच उदाहरण घ्या की, बारामती पोटनिवडणुकीविषयी (Baramati By-election) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना तुमच्या तोंडून तुमच्या सूनेचं म्हणजे सुनेत्राकाकींचं साधं नाव ही येऊ नये? इतकी कटुता? पण त्याचवेळी लेकीचं नाव घेऊन तोंड भरून कौतुक आणि भरभरून प्रशंसा! पत्रकारांनी विचारलेला प्रश्न आणि त्यावर शरद पवारांनी दिलेलं उत्तर एकदा ऐकूयात म्हणजे मला काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट होईल.

हेही वाचा – सुनेत्रा पवारांच्या जीवाला मोठा धोका? निनावी पत्राने वाढला तणाव; पत्रात नेमकं काय लिहिलं?

सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलात मग प्रचार करणार का?

ऐकलंत… पत्रकारांनी काय विचारलं होतं, ‘सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलात मग प्रचार करणार का तुम्ही, सुप्रियाताई वगैरे… त्यावर शरद पवार काय म्हणाले? “नाही. आम्ही उमेदवार उभा केला नाही. प्रचार काय करायचा? मागची निवडणूक जी झाली त्यात सुप्रियाविरूद्ध ह्याच उमेदवार होत्या. ज्यांनी आज फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरोधात होत्या. तीन लाख मतांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळं आम्हाला त्याचं काही वैषम्यनाही. सुप्रियाची चौथी निवडणूक होती.”

तुमच्या मनी लेकी-सूनेत भेदभाव का?

लोकसभेला लेकीविरूद्ध सून काय उभी राहिली… मनात इतकी अढी धरून ठेवलीत तुम्ही..? तुम्ही अजितदादांच्या विरोधात तुमच्या नातवाला उभं केलंत ते चाललं पण अजिदादांनी तुमच्या लेकीच्या विरोधात त्यांच्या पत्नीला उभं केलं ते नाही चाललं? सुप्रियाताई जिंकल्या तेव्हा बारामतीची लेक जिंकली, म्हणत बारामतीकरांनी तुमच्या लेकीचं कौतुक केलं तसंच अजितदादांनी सुनेत्राकाकींना राज्यसभेवर पाठवलं तेव्हा बारामतीची सून खासदार झाली म्हणत तुमच्या सूनेचंही कौतुक केलंच की! सुप्रियाताई जशा बारामतीच्या लेक अगदी तशाच सुनेत्राकाकी बारामतीच्या सून! बारामतीकरांना दोघीही सारख्या! मग तुमच्या मनी लेकी-सूनेत भेदभाव का?

आपल्या उमेदवाराची नौका विजयापासून दूर

आता उरला प्रश्न तुम्ही पोटनिवडणुकीत उमेदवार न उतरवता दिलेल्या पाठिंब्याचा… एकीकडं उमेदवार न उतरवता जाहीर पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडं म्हणायचं त्यांचा प्रचार काय करायचा? म्हणजे? तुम्ही दिलेला पाठिंबा हा मनमोकळेपणानं दिलेला पाठिंबा नाही. सहानुभूतीच्या लाटेत आपल्या उमेदवाराची नौका विजयापासून दूर फेकली जाईल या भितीपोटी दिला गेलेला हा पाठिंबा असल्याचं वरकरणी तरी दिसून येतं. शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारानं त्यांच्या सूनेकडूनच सपाटून मार खाल्ला, असं उद्या कानावर पडू नये यासाठी केली गेलेली ही राजकीय खेळी तर नाही ना तुमची नंबर एक! आणि नंबर दोन… उमेदवार न देता आम्ही आपद्धर्म पाळला हे जगाला सांगत सुटता यावं म्हणून!

पोटनिवडणुकीत सुनेत्राकाकी जिंकतील, असं चित्र

तुम्ही उमेदवार दिला काय किंवा न दिला काय, तुम्ही पाठिंबा दिला काय किंवा न दिला काय पोटनिवडणुकीत सुनेत्राकाकी जिंकतील, असं सध्या तरी चित्र आहे. कारण ही निवडणूक जशी सलग आठवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजितदादांच्या बारामतीची आणि त्यांना निवडून देणाऱ्या बारामतीकरांची आहे तशीच ती बारामतीच्या सूनेचीही आहे. तसं पाहायला गेलं तर विजयराव मोरे शरद पवारांपेक्षा वयानं दोन महिन्यांनी मोठे आहेत पण शरद पवारांमुळंच आपण आमदार झालो याची जाणीवही ते बाळगून आहेत. त्यामुळं कुणी कुणाचा शब्द पाळला किंवा कुणी कुणाचा शब्द टाळला हे त्या दोघांनाच ठाऊक?

साहेबांनी दिलेलं उत्तर तर अनाकलनीय आहे

आता सुनेत्राकाकींनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागूनही काँग्रेसनं स्वतःचा उमेदवार उभा केल्याबाबत साहेबांनी दिलेलं उत्तर तर अनाकलनीय आहे. त्यांनी या गोष्टीला स्थानिक पातळीवरील राजकीय निर्णय मानलं. हा मुद्दा राज्यस्तरीय नसून, प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, असं म्हणत उमेदवार उभा करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचं एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या समर्थनच केलं. म्हणजे हे असं झालं, एकीकडं उमेदवार न देता सुनेत्राकाकींना पाठिंबा आणि दुसरीकडं सुनेत्राकाकींच्या विरोधात उमेदवार उभा करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचं समर्थन! म्हणजे थोडक्यात, हा ही आपला आणि तो ही आपला!

अजितदादा, बारामतीत तुम्ही नाही, म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही

असो, वयाच्या 85 व्या वर्षीही तुम्हाला व्हीलचेअरवर बसून राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घ्यावीशी वाटते यातूनच पवार साहेब राजकारणाशिवाय राहू शकत नाहीत, हे सिद्ध होतं. पण हेच राजकारण जेव्हा घराच्या चौकटीतून आत शिरतं तेव्हा या राजकारणाला दुजाभावाचा, कटुतेचा रंग चढतो. अशावेळी मला माजी आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांचा जिथं अपघात झाला त्या गोजुबावी येथे जाऊन त्यांनी तिथं ठेवलेल्या त्यांच्या पत्रातील ती ओळ आठवते… अजितदादा, बारामतीत तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही!

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts