Northern Japan : जपानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. सोमवारी पहाटे उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला, परंतु यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही. होक्काइडोमधील साराबेत्सु या लहान शहराच्या पश्चिमेला 18 किलोमीटर अंतरावर 81 किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाल्याची माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे.
हेही वाचा : “ट्रम्प यांच्यावर गोळीबार हा त्यांच्या कृतींचा परिणाम, भारतातील लोकांनाही असंच
लोकांनी घरं केली रिकामी :
या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांमुळं परिसरात घबराट पसरली, परिणामी अनेक ठिकाणी लोकांना आपली घरं रिकामी करावी लागली. प्राथमिक अहवालानुसार, आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही. तसंच जपान हवामान संस्थेनं भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही दिलेला नाही. हा भूकंप जपान वेळेनुसार सोमवारी सकाळी सुमारे 5:24 वाजता झाला. यामुळं प्रभावित झालेल्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकांना उभे राहणेही कठीण झालं आणि काही ठिकाणी वस्तू पडल्याचं समोर आलं आहे.
गेल्या सोमवारीही झाला होता भूकंप :
जपान भूकंपप्रवण प्रदेशात वसलेलं आहे. त्यामुळं तिथं वेळोवेळी भूकंप होत असतात. गेल्या सोमवारी, उत्तर जपानजवळ 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर थोड्या काळासाठी त्सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.
भूकंपाच्या तीव्रतेनुसार काय परिणाम होऊ शकतो :
0 ते 1.9 रिश्टर स्केलचा भूकंप केवळ सिस्मोग्राफद्वारे ओळखला जाऊ शकतो. 2 ते 2.9 तीव्रतेचा भूकंप आल्यास सौम्य धक्के बसतात. जेव्हा 3 ते 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप होतो तेव्हा त्याचा परिणाम जवळून जाणाऱ्या ट्रकसारखा होतो. 4 ते 4.9 तीव्रतेचा भूकंप आल्यास खिडक्या फुटू शकतात. तसंच भिंतींवर टांगलेल्या फ्रेम्स पडू शकतात. 5 ते 5.9 रिश्टर स्केलचा भूकंप आल्यास फर्निचर हलू शकते. 6 ते 6.9 तीव्रतेचा भूकंप आल्यास इमारतींना तडे जाऊ शकतात. तसंच वरच्या मजल्यांचं नुकसान होऊ शकते.
भूकंप का होतात? :
पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथं जिथं एकमेकांवर आदळतात तिथं भूकंपाचा धोका असतो. जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भूकंप होतो. प्लेट्स एकमेकांवर घासतात आणि त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. त्या घर्षणामुळं जमीन थरथरायला लागते.











