Suraj Nambiar | मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. कारण मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध कपल मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नंबियार (Suraj Nambiar) हे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांचा घटस्फोट झाला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एका संयुक्त पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरू होती. अशातच आता त्या दोघांनी स्वत: पोस्ट शेअर करत ते दोघं विभक्त झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
हेही वाचा – “नमाज अदा करायला घरात जागा नसेल तर संख्या कमी करा….”, योगी आदित्यनाथांचं खळबळजनक वक्तव्य, दिला थेट इशारा
मौनी रॉयपासून का झाला विभक्त? सूरज नंबियारनं नेमकं काय सांगितलं?
मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी केलेल्या घटस्फोटाच्या घोषणेपासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. यामध्ये काहींनी दावा केला आहे की मौनीने सूरजकडून पोटगीची मागणी केली होती. तर काहींनी त्यांच्या विभक्त होण्यामागे दिशा पटानीचा हात असल्याचा दावा केला. तर या अफवांवर आता सूरज नंबियारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.
सूरज नंबियारने त्याच्या आणि मौनीच्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या अफवांवर प्रतिक्रिया देताना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, “आमच्या विभक्त होण्याबद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवा निराधार, पूर्णपणे द्वेषपूर्ण आहेत. मला हे स्पष्ट करायचे आहे की, यात पोटगीचा कोणताही प्रश्न नाही, कोणताही वाद नाही आणि यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग नाही. मौनी आणि मी परस्पर आदराच्या आधारावर आणि एकमेकांच्या भल्यासाठी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दोन व्यक्तींनी फक्त एकटे राहण्याची विनंती केली आहे, त्यांना बदनाम करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.”
पुढे त्याने लिहिले की, मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की आमच्यापैकी कोणावरही किंवा कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीवर जे आरोप केले जात आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. यात इतर कोणालाही ओढणे पूर्णपणे अन्यायकारक आहे, विशेषतः अशा निष्पाप मित्रांना ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. मी आणि मौनी या संपूर्ण काळात सन्मानाने वागलो आहोत आणि आम्हाला आशा आहे की या प्रकरणावर कोणत्याही अफवा पसरवल्या जाणार नाहीत.

आमच्या संयुक्त निवेदनात जे काही सांगायचे होते ते सर्व सांगितले आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्याचा आदर करावा आणि आम्हा दोघांना शांततेने पुढे जाण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, असंही सूरजने म्हटलं आहे.
सूरजने पोस्टमध्ये दिशा पटानीचा का केला उल्लेख?
दरम्यान, मौनी रॉय आणि दिशा पटानी या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोन्ही अभिनेत्री अनेकदा एकत्र दिसतात. त्या अनेकदा पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. त्यांच्या या मैत्रीमुळेसोशल मीडियावरील काही युझर्सनी दिशाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणात दिशा पटानीला खेचलं जात आहे. मौनी रॉयसोबत विभक्त झाल्यानंतर दिशाने इन्स्टाग्रामवर सूरज नंबियारला अनफॉलो केल्याचा दावा युझर्सनी केला आहे. त्यानंतर दिशाला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. दिशाने मौनी आणि सूरजचं नातं तोडलं, दिशाने मौनीचा घटस्फोट घडवून आणला अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स करत दिशाला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे सूरजने इन्स्टावर पोस्ट करत या सगळ्याशी दिशाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.








