Indian Rupee Fall : सध्या भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरत आहे. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांची सुरू असलेली मोठी माघार. जागतिक गुंतवणूकदार भारतातून पैसा काढून इतर उदयोन्मुख बाजारपेठा आणि सुरक्षित पाश्चात्य गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहेत.
2025 च्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 85.8 रुपये होता. मात्र 2026 च्या सुरुवातीपर्यंत तो 90 रुपयांवर घसरला आणि मागील आठवड्यात तब्बल 97 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.
भारतीय बाजार ‘ओव्हरव्हॅल्युड’ ठरतोय
रुपयाच्या घसरणीमागील मोठं कारण म्हणजे भारतीय शेअर बाजार इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत खूप महाग झाला आहे. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) भारतातून आपली गुंतवणूक काढत आहेत. गेल्या 18 महिन्यांत भारतीय बाजारातून सुमारे 53 अब्ज डॉलरची गुंतवणूक बाहेर गेली आहे.
विशेष म्हणजे बाजारातील मजबुतीच परदेशी गुंतवणूकदारांना जास्त किंमतीत बाहेर पडण्याची संधी देत आहे.
मिडल क्लासने बाजाराला दिला आधार
पूर्वी एवढ्या मोठ्या परदेशी गुंतवणूक माघारीमुळे बाजार कोसळले असते. मात्र आता भारतीय मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करत आहे. SIP च्या माध्यमातून दरमहा नियमित गुंतवणूक होत असल्याने बाजाराला आधार मिळत आहे.
2025 च्या सुरुवातीला मासिक SIP गुंतवणूक 20 हजार कोटी रुपये होती. ती मार्च 2026 पर्यंत वाढून 32,087 कोटी रुपयांवर पोहोचली. याच देशांतर्गत गुंतवणुकीमुळे विदेशी पैसा बाहेर जात असूनही बाजार तुलनेने स्थिर राहिला आहे.
भारताचा P/E रेशो खूप जास्त
भारतीय बाजाराचा प्राइस-टू-अर्निंग (P/E) रेशो सध्या ट्रेलिंग आधारावर 22.5 तर पुढील वर्षाच्या अंदाजानुसार 18.8 आहे. याउलट इतर उदयोन्मुख बाजारांचा सरासरी P/E फक्त 15 ते 16 दरम्यान आहे.
- चीन : 12 ते 14
- दक्षिण कोरिया : 10 ते 12
- ब्राझील : 8 ते 10
याचा अर्थ भारतीय बाजार इतर बाजारांच्या तुलनेत 40 ते 150 टक्क्यांपर्यंत प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. भारताची विकास क्षमता चांगली असली तरी बाजार खूप महाग झाल्याचं चित्र आहे.
एफडीआयमधूनही पैसे बाहेर
परदेशी गुंतवणुकीची माघार आता थेट विदेशी गुंतवणूक (FDI) क्षेत्रातही दिसत आहे. RBI च्या अहवालानुसार 2024-25 मध्ये एकूण FDI 81 अब्ज डॉलर होता, मात्र निव्वळ FDI एक अब्ज डॉलरपेक्षाही कमी राहिला.
FY26 मध्ये एकूण FDI 95 अब्ज डॉलरवर पोहोचला असला तरी निव्वळ प्रवाह फक्त 7.7 अब्ज डॉलर राहिला.
भारतीय कंपन्यांकडून परदेशात वाढती गुंतवणूक हा सकारात्मक संकेत मानला जात असला तरी विदेशी कंपन्या भारतातील हिस्सा विकून मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर नेत असल्याने चिंता वाढली आहे.
MNC आणि PE/VC फंडांचा मोठा नफा
भारतीय बाजारातील उच्च मूल्यांकनाचा फायदा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या (MNC) घेत आहेत. उदाहरणार्थ, हुंडई इंडियाने भारतात उच्च मूल्यांकनावर IPO आणून त्यातून मिळालेला पैसा मायदेशी पाठवला.
याशिवाय PE आणि VC फंडांनी भारतीय स्टार्टअपमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात केलेल्या गुंतवणुकीवर आता मोठा नफा कमावत बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.
इराण युद्धामुळे वाढला दबाव
दरम्यान, इराण युद्धामुळे कच्च्या तेलासह इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारताचा चालू खाते तुटीवर (Current Account Deficit) दबाव वाढण्याची शक्यता आहे.
जर युद्ध आणखी सहा महिने चालले तर चालू खाते तूट GDP च्या 0.9 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे रुपयावर आणखी दबाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
RBI ची तात्पुरती उपाययोजना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सध्या विदेशी चलन साठा आणि स्वॅप सुविधांच्या मदतीने रुपयाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इराण युद्ध संपेपर्यंत रुपयावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारताने अधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व्यवसाय सुलभता वाढवणे आणि मोठे आर्थिक सुधार करणे अत्यंत आवश्यक आहे.












