Film Corporation Election: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत यंदा रंगत वाढत असताना आता वादाचं वातावरणही तापू लागलं आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी निवडणूकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पाटकर यांनी सांगितलं की, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता. मात्र, काही राजकीय दाबावामुळे त्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. “माझा उमेदवारी अर्ज मुद्दाम अडवण्यात आला,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच, एका मंत्र्यांचा ओएसडी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडून बसल्याचा आरोपही त्यांनी केला. “तो विविध लोकांवर दबाव टाकत आहे. कोण उमेदवार असावा आणि कोण नसावा, हे ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असं पाटकर यांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर त्यांनी शासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
दरम्यान, निवडणुकीत विरोधी गटांवरही त्यांनी निशाणा साधला. गेल्या काही वर्षांत महामंडळाची कामगिरी समाधानकारक नसल्याचं सांगत, संस्थेच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांचे प्रश्न, पगारातील विलंब आणि प्रशासनातील त्रुटी याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
निवडणूक यंदा कुठे आहे?
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची ही निवडणूक यंदा कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे पार पडणार आहे. २५ मे रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार असून त्यानंतर अर्जांची छाननी केली जाईल. २६ ते २८ मे दरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल. अंतिम उमेदवारांची यादी २९ मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. ७ जून रोजी मतदान होणार असून ८ जूनला निकाल जाहीर केला जाणार आहे. या सर्व घडामोडींमुळे यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची आणि वादग्रस्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










