Raj Thackeray on Savarkar : आज स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने अनेक नेते मंडळींनी वेगवेगळ्या सोशल माध्यमांतून अदरांजली अर्पन केली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakceray) यांनी सावरकर यांच्यावर राजकारण करणाऱ्यांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या एक्स या सोशल अकाउंटवर खरमरीत पोस्ट (Social media posts) शेअर केली आहे.
राज यांची पोस्ट…
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत.
सावरकरांचा उदोउदो करून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न
सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का ? सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं.
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत… pic.twitter.com/6kmRO5jthI
— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2026
व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता पोस्ट शेअर
हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे. याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे.
धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही
सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी होते पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरु आहे. आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत.
महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला
उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे? मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय.
याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचं याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत ? आणि यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हाट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे. आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.












