Manoj Jarange Audio Clip Controversy : कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता, त्याचा संदर्भ आणि त्यासंदर्भात करण्यात येणारे दावे हे या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे क्लिपची स्वतंत्र पडताळणी होण्याबरोबरच संबंधित व्यक्तींची अधिकृत भूमिका समोर येणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आल्याने राजकीय चर्चांना वेग आला. अखेर श्रीकांत शिंदे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देत कथित ५०० कोटी रुपये आपल्यापर्यंत पोहोचले नसल्याचे म्हटले. दरम्यान, या प्रकरणावरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना हा वाद पुढे न वाढवण्याच्या सूचना दिले आहे.
श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
मनोज जरांगे पाटील(Manoj jarange patil) यांनी जालना येथे पत्रकार परिषदेत एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्यापर्यंत ५०० कोटी रुपये पोहोचवण्यात आल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला. हे पैसे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या माध्यमातून दिल्याचे कथित संभाषणात म्हटल्याचे वृत्त आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी, “जरांगे पाटील यांना जो प्रश्न पडला आहे, तोच मलाही पडला आहे. ते ५०० कोटी रुपये नेमके कुठे गेले, याचा मीही शोध घेत आहे,” अशा आशयाचे वक्तव्य केले. एवढी मोठी रक्कम नेण्यासाठी किती गाड्या लागतील, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंचे पक्षातील नेत्यांना निर्देश
या कथित ऑडिओ क्लिपमुळे भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. काही नेत्यांनी या क्लिपमागे राजकीय कट असल्याचा संशय व्यक्त केला, तर काहींनी तिच्या सत्यतेची तपासणी करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आरोप-प्रत्यारोप थांबवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. महायुतीतील दोन पक्षांमध्ये या प्रकरणावरून अधिक वाद निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर त्यांच्या सूचनांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics: ५०० कोटींच्या कथित व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल; शिंदे-जरांगे प्रकरणात नवा ट्विस्ट!
कथित ऑडिओ क्लिपची चौकशी होणार
या प्रकरणाची सत्यता तपासण्याची मागणी विविध राजकीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी (Audio Clip forensic test) करण्याचे आदेश दिले आहे. क्लिपमधील आवाज खरे आहेत की त्यात फेरफार करण्यात आला आहे, तसेच संभाषणाचा मूळ स्रोत काय आहे, याची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, कथित ऑडिओ क्लिपची सत्यता (Truth)अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेली नसल्याने त्यातील दाव्यांना अंतिम सत्य मानता येणार नाही.
राजकीय वर्तुळाचे लक्ष चौकशीकडे
या प्रकरणामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंधांबाबत चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला जरांगे पाटील यांनी कथित क्लिपच्या आधारे प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे संबंधित नेत्यांनी आरोप फेटाळत चौकशीची मागणी केली आहे. आता या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता काय, त्यातील आवाज कोणाचे आहेत आणि ५०० कोटी रुपयांच्या दाव्यामागे कोणतेही ठोस पुरावे आहेत का, हे तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. (LS Marathi)
हेही वाचा :








