• Home
  • Top News
  • पुण्यातील कुरकुंडी फाट्यावर भीषण अपघात! विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक जखमी
गुन्हा

पुण्यातील कुरकुंडी फाट्यावर भीषण अपघात! विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक जखमी

Kurkundi Phata Accident
3

चंद्रकांत मांडेकर | खेड प्रतिनिधी

Kurkundi Phata Accident : महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात सफारी आणि स्कुटी धडकून भीषण अपघात झाला.खेड तालुक्यातील शिरोली – पाईट रस्त्यावरील कुरकुंडी फाट्यावर घडलेल्या या दुर्घटनेत आदिती नवनाथ राळे (वय १९, रा. कुरकुंडी) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात विद्यार्थिनींसह दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर सफारीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, गाडीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर येथून पाईटकडे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामासाठी एका व्यक्तीला मतदान केंद्रावर सोडण्यासाठी सफारी गाडी (एमएच १२ व्हीजी १९७७) जात होती. त्याचवेळी कुरकुंडी गावाकडून कडूसच्या दिशेने जाणाऱ्या स्कुटी (एमएच १४ एमडब्ल्यू ३७९२) सोबत सफारीची कुरकुंडी फाट्यावर जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्यालगत महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात घुसली. अचानक झालेल्या या अपघा विद्यार्थिनींमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत अनेक जणी गंभीर जखमी झाल्या.

हेही वाचा : सलमान खानने बिश्नोई गँगची माफी मागावी? सदावर्तेंनी गँगवर काय म्हटलं?

आदिती राळेचा उपचारादरम्यान मृत्यू (Kurkundi Phata Accident)

या अपघातात आदिती नवनाथ राळे (Aditi Rale Death) हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. संजना सुधीर राळे (Sudhir Rale) (वय १९), वैष्णवी चंद्रकांत भोकसे (वय १९), संघनी निलेश भोकसे (वय १९), वैष्णवी संतोष जाधव (वय २०) आणि गायत्री विठ्ठल कोळेकर (वय १९, रा. आसखेड, ता. खेड) या विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.याशिवाय स्कुटीवरील रोहन गारगोटे आणि ओंकार नेहरे (दोघेही रा. कडूस) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर सफारीचा चालक प्रमोद वसंत चाटे (वय ३२, रा. आळंदी) हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सफारीचे मालक विकास हिरामण कराड (रा. आळंदी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त ढमाळ, पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक पराग जावळे, पोलीस हवालदार निलेश काळे आणि कैलास चासकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींना भीषण अपघाताला सामोरे जावे लागल्याने कुरकुंडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वाहनांमुळे रस्त्यालगतच्या बसस्थानकांवर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts