महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर! तुमचं नाव नसेल तर काय कराल?

Karj Mafi Yojana 2026
5

Karj Mafi Yojana 2026 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलीय… राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची (Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme) चौथी यादी जाहीर केली असून, या यादीत तब्बल १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय… त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र या यादीत तुमचं नाव आहे का? नाव असेल तर कर्जमाफीचे पैसे कधी मिळणार? नाव नसेल तर काय करायचं? आणि कर्जमाफी मिळवण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार? हे सगळं समजून घेऊयात…

शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर (Karj Mafi Yojana 2026)

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme) या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीककर्ज माफ करण्याची तरतूद आहे…. विशेष म्हणजे चौथ्या यादीत एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय… शासनाच्या निकषांनुसार ठरावीक कालावधीत घेतलेलं आणि निर्धारित तारखेपर्यंत थकीत असलेलं पीककर्ज या योजनेसाठी पात्र ठरू शकतं… मात्र सर्व प्रकारची कर्जं या योजनेत माफ होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कर्ज योजनेच्या निकषांमध्ये बसतं का, हे संबंधित बँकेत तपासणं आवश्यक आहे…

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीच्या यादीत आपलं नाव आहे की नाही, हे कसं तपासायचं? यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम ज्या बँकेतून पीककर्ज घेतलं आहे, त्या बँकेच्या शाखेत जावं… त्याचबरोबर ग्रामपंचायत किंवा संबंधित विकास सेवा सहकारी संस्थेतही यादीची चौकशी करता येईल… यादीत नाव असल्यास आपला कर्जखाते क्रमांक, नाव आणि थकबाकीची रक्कम योग्य आहे का, याची खात्री करून घ्यावी.

यादीत नाव आलं असेल तर पुढे काय करायचं? शेतकऱ्यांनी आधार कार्ड, कर्जखात्याचे तपशील आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावं… तिथे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी…. त्यानंतर कर्जाची रक्कम आणि वैयक्तिक माहिती योग्य असल्याची खात्री करून मान्यता द्यावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. म्हणजेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात रोख स्वरूपात मिळणार नसून थेट थकीत पीककर्ज कमी करण्यासाठी वापरली जाणार आहे.

हेही वाचा : Himanshu Bhau : लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर शत्रू अमेरिकेत पकडला? कोण आहे हा हिमांशू भाऊ?

तुमचं नाव नसेल तर काय करावं? (Karj Mafi Fourth List)

पण चौथ्या यादीत नाव नसेल तर काय करायचं? अशा शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संबंधित बँकेत चौकशी करावी. बँकेने कर्जखात्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे का, आधार क्रमांक आणि कर्जखात्याची माहिती जुळते का, तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली आहे का, हे तपासावं… माहितीमध्ये काही चूक असल्यास दुरुस्तीची मागणी करावी… बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयात लेखी तक्रार करता येईल… मात्र यादीत नाव नसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेलच, असं नाही. त्यासाठी शासनाचे पात्रता निकष पूर्ण करणं आवश्यक आहे…

आता आणखी एक प्रश्न म्हणजे कर्जमाफी मिळवण्यासाठी नवीन अर्ज करावा लागणार का? तर सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना स्वतंत्र नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही… कारण संबंधित बँकांकडून कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जाते.. मात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यासाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक, बँक पासबुक, पीककर्ज खाते क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक ही कागदपत्रं सोबत ठेवावीत. कागदपत्रांमध्ये काही तफावत असल्यास आवश्यक पुरावे देऊन दुरुस्ती करून घ्यावी…

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा लाभ?

यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र निकष आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आलीय. त्यामुळे केवळ थकबाकीदार शेतकरीच नाही, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनीही आपल्याला कोणता लाभ लागू होतो, याची चौकशी करणं आवश्यक आहे.

एकूणच, कर्जमाफीची चौथी यादी जाहीर झाल्यामुळे राज्यातील आणखी एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र यादीत नाव आलं म्हणजे कर्ज लगेच माफ झालं, असं नाही. त्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि आवश्यक पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत किंवा ग्रामपंचायतीत जाऊन यादी तपासावी. नाव असेल तर प्रमाणीकरण पूर्ण करावं आणि नाव नसेल तर त्यामागचं कारण जाणून घ्यावं. आता चौथ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये प्रत्यक्ष रक्कम कधी जमा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts