Minister Helicopter Ride 22 Vehicle Convoy : आखाती देशातील तणावामुळे जगभरात इंधन तुटवडा निर्माण झालाय. या जागतिक संकटाचे चटके आता भारतालाही बसू लागले असून, देशात इंधनाची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी नागरिकांना इंधन जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. तर मंत्र्यांनाही आपला ताफा कमी करण्याचे निर्देश दिले आहे. पीएम मोदींनी आपला ताफा देखील कमी केला आहे. सीएम देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला ताफा कमी केला आहे. मात्र, महायुतीतील मंत्री मोदींच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत मोठा ताफा घेऊन फिरताना दिसत आहे.
दरम्यान, मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यात इंधनाचा तुटवडा असताना संजय राठोड चक्क हेलिकॉप्टरमधून VIP दौरा करत २० ते २२ वाहनांच्या ताफ्यातून फिरताना दिसत आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री मोदींच्या आवाहनाला जुमानत नाहीत का? हे येणाऱ्या काळात समजणार आहे. मंत्री संजय राठोड यांनी नागपूर ते पोहरादेवी हा प्रवास चक्क हेलिकॉप्टरने केला आणि राज्यात त्यांच्या या दौऱ्याची मोठी चर्चा सुरू झालीय.
नागपूरहून थेट पोहरादेवी गाठण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर
‘बंजारा विरासत’ या विकासकामांची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मंत्र्यांनी नागपूरहून थेट पोहरादेवी गाठण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. इतकेच नव्हे तर, ते हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी तब्बल २० ते २२ सरकारी वाहने आणि अनेक खासगी गाड्यांचा ताफा सज्ज होता. एका बाजूला सामान्य माणूस थेंब-थेंब इंधनासाठी वणवण फिरत असताना, मंत्र्यांचा हा अवाजवी लवाजमा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आणि संताप वाढवणारा ठरला.
पुढील प्रवास हेलिकॉप्टरने करण्याचे ठरवले
मिळालेल्या माहितीनुसार, पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय आणि इतर विकासकामांची पाहणी आटोपल्यानंतर, मंत्री संजय राठोड हे एका खाजगी कार्यक्रमासाठी यवतमाळला रवाना होणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पोहरादेवी ते यवतमाळ या पुढील प्रवासासाठीही त्यांनी हेलिकॉप्टरचाच वापर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता विरोधक याला कशा पद्धतीने घेतात हे पाहायला मिळणार आहे.











