Nasrapur Atrocity Case: नसरापूर येथील गाजलेल्या अत्याचार प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला असून सोमवारी पीडित बालिकेच्या आजीची विशेष न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ महत्त्वाच्या साक्षीदारांच्या जबाबांची नोंद पूर्ण झाली आहे.
या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुरू आहे. प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याच्याविरुद्ध न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत.
घटनेचा तपास पूर्ण करत पोलिसांनी जलदगतीने कारवाई केली होती. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १४ दिवसांच्या आत आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाने या खटल्यासाठी एकूण ८२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आतापर्यंत १३ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली आहे. तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. हिंमतराव जाधव यांनी संबंधित साक्षीदारांची उलटतपासणी केली.
खटल्यादरम्यान पीडित बालिकेचे आई-वडील, मृत्यू प्रकरणातील पंचनाम्यास उपस्थित असलेले पंच तसेच आरोपीला बालिकेसोबत पाहिल्याचा दावा करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर नोंदविण्यात आले आहेत.
या संवेदनशील प्रकरणातील पुढील सुनावणीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, उर्वरित साक्षीदारांच्या साक्षीनंतर खटल्याला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.






