Minor Married Girl Abortion Missing : बीड जिल्ह्यातील (Beed Crime news) माजलगाव येथे एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात (Abortion of a minor married woman) केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे हा गर्भपात माजलगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. गर्भपात प्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्राव (Excessive bleeding) झाल्याने पीडित तरुणीची प्रकृती गंभीररीत्या बिघडली. नंतर तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुलगी बेपत्ता समोर आले आहे.
दरम्यान, माजलगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर झालेल्या चौकशीत ही तरुणी जिल्हा रुग्णालयात दाखलच झाली नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने गर्भपातासाठी जे नियम आणि वैद्यकीय प्रक्रिया निश्चित केल्या आहेत, त्यांचे पालन न करता ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक देखील संभ्रमात पडले आहेत.
अल्पवयीन तरुणीचा ठावठिकाणा लागत नाही
उपचारानंतर संबंधित अल्पवयीन तरुणीचा ठावठिकाणा लागत नसल्याने रुग्णालय प्रशासनाची मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरूया प्रकरणात बालविवाह केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि पीडित तरुणीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मुलीच्या वयाची पडताळणी
माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी परभणी जिल्ह्यात विवाह लावून देण्यात आली होती. ९ जून रोजी तिला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांच्या निदर्शनास आले की ही मुलगी अल्पवयीन आहे. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती खरोखर अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.
आई-वडील, सासू-सासरे आणि पतीवर गुन्हा
त्यानुसार, मुलीच्या आई-वडिलांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी आणि सासू-सासऱ्यांनी विवाहाला सहकार्य केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. दुसरीकडे, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलिस ठाणे आणि पिंक पथकाकडून सक्रियपणे सुरू आहे.











