Mumbai Pune Trains: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढल्याने अनेक रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या गाड्या रद्द तर कोणत्या डायव्हर्ट केले आहेत.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.घाट परिसरातील हिल सेक्शनमध्ये दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आले आहेत. तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. तसेच काही गाड्या अंशतः थांबवण्यात आल्या किंवा नव्या स्थानकांवरून सुरू करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण १६ गाड्या रद्द करण्यात आल्या असून ६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्यांच्या वेळापत्रकातही छोटा बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक परिसरात स्लॅब कोसळला
रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्या
मुंबई – पुणे आणि आसपासच्या मार्गावरील अनेक महत्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस तसेच इंटरसिटी सेवांचा समावेश आहे. काही धुळे आणि इतर मार्गावरील गाडयाही रद्द झाल्या आहेत.
मार्ग बदललेल्या (Diverted) गाड्या
काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या गाड्या आता कल्याण- इगतपुरी–मनमाड–दौंड कॉर्ड मार्गे किंवा पर्यायी मार्गाने चालवल्या जात आहेत. यामध्ये अहमदाबाद–कोल्हापूर एक्सप्रेस, इंदूर–दौंड एक्सप्रेस, अहमदाबाद–पुणे दुरांतो, बिदर–मुंबई एक्सप्रेस तसेच नांदेड–पनवेल एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
अंशतः थांबवलेल्या गाड्या (Short Terminate)
काही गाड्या त्यांच्या नियोजित गंतव्यस्थानाऐवजी आधीच थांबवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ काही हमसफर, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस सेवा पुणे किंवा पनवेल येथेच थांबवण्यात आल्या आहेत.
नव्या ठिकाणांहून सुरू होणाऱ्या गाड्या
काही गाड्या आता त्यांच्या मूळ स्थानकाऐवजी पुणे किंवा पनवेल येथून सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये हमसफर एक्सप्रेस आणि उद्यान एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
वेळापत्रकात बदल
काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. काही गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत, तर काही गाड्यांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रवास करण्यापूर्वी अधिकृत अद्ययावत माहिती तपासावी.
मुसळधार पावसामुळे घाट परिसरात सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे रेल्वे सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












