Pune Municipal Schools Holiday: पुणे शहरातील महापालिकेच्या 101 शाळांना आजपासून रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामागचे कारण काय आहे? महापौरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
पुणे शहरातील महापालिकेच्या १०१ शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर (Pune Municipal Schools Holiday) करण्यात आली आहे. आळंदी आणि देहू परिसरात मुसळधार पावसामुळे निर्मण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पुणे महापालिकेच्या इतर शाळा तसेच खासगी शाळांचे नियमित वर्ग सुरू राहणार आहेत.
हेही वाचा: लोणावळ्यात कलम 163 लागू; मग पर्यटकांनी नेमकं काय करायचं? फिरायला जाण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम
वारकऱ्यांसाठी शाळांचे तात्पुरत्या निवास्थानी रूपांतर
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी आणि देहू परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक वारकरी अडकले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने तातडीने पुढाकार घेत १०१ शाळांमध्ये वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी निवासासोबतच भोजन, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत सुट्टी (Pune Municipal Schools Holiday)
वारकऱ्यांच्या निवास व्यवस्थेमुळे संबंधित शाळांमध्ये नियमित अध्यपान शक्य नसल्याने त्या १०१ शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय केवळ निवडक शाळांसाठी लागू असून उर्वरीत महापालिका शाळा आणि शहरातील खासगी शाळा नियमानुसार सुरू राहतील.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी काय सांगितले? (Manjusha Nagpure)
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी परिसरातील काही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी थेट आळंदीकडे न जाता पुण्यात थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पुणे महापालिकेने १०१ शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था केली असून संबंधित शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्याचबरोबर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पूर्वी जाहीर केलेली पाणी कपात तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी विविध ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून तीन ठिकाणी मोठे जर्मन हँगर उभारून अतिरिक्त निवासाची सुविधाही तयार करण्यात आली आहे.
वाहतूक व्यवस्थेवरही विशेष भर
वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांसोबत समन्वय साधण्यात आला आहे. शहरातील वाहतूक शक्य तितकी सुरळीत राहावी यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











