Parth Pawar, Kainat Dhar, Engagement: रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार यांच्यासोबत दिसलेली तरुणी नेमकी कोण, याची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली होती. आता त्या चर्चांवर पडदा पडला असून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार असून पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मग पार्थ पवारांची होणारी पत्नी कोण आहे? जाणून घेऊया…
पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा कायनात धार यांच्यासोबत साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहानंतर आता पवार कुटुंबातील आणखी एका शुभकार्याची तयारी सुरू झाली आहे.
रेवती सुळे यांच्या विवाहात चर्चेत आली जोडी :
मुंबईत पार पडलेल्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात धार यांनी एकत्र उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत दोघांची एंट्री झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा रंगली होती. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
हेही वाचा : अचानक FDA पोहोचलं अन् उघड झाला प्रकार! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध कॅफेचे लायसन्स सस्पेंड
कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने उपस्थिती :
कायनात धार गेल्या काही काळापासून पवार कुटुंबाच्या विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी ती आणि पार्थ पवार यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते.
आनंदाच्या प्रसंगांबरोबरच पवार कुटुंबाच्या कठीण काळातही कायनात धार उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये जवळचे संबंध असल्याची चर्चा यापूर्वीपासूनच होती.
कोण आहे कायनात धार?
कायनात धार ही मूळची हरियाणातील असून सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षांत ती पार्थ पवार यांच्यासोबत अनेक सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. मात्र, तिने स्वतः सार्वजनिक जीवनापासून काहीसे अंतर राखले आहे.
29 जुलैला साखरपुडा :
Parth Pawar, Kainat Dhar, Engagement: पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात होणार असून, दोन्ही कुटुंबातील नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
रेवती सुळे यांच्या विवाहानंतर आता पार्थ पवार यांच्या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या समारंभाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












