Nepal Floods News: नेपाळमध्ये निसर्गाचा कहर पाहायला मिळत आहे. भीषण पुरामुळे शेकडो जीव धोक्यात आले असून, या जलप्रलयामागची कारणंही तितकीच धक्कदायक आहेत.
नेपाळमध्ये निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण ( Nepal Floods News ) केलं आहे. रसुवा परिसरातून वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या आपत्तीने संपूर्ण नेपाळला हादरवून सोडलं असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
यात शेकडो नागरिक बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण पुरात आतापर्यंत जवळपास १६० जणांचा मृत्यू (Nepal flood deaths) झाला आहे. तर ७५० अधिक नागरिक बेपत्ता (Nepal flood missing people) असल्याची माहिती समोर आली आहे. पुराच्या वेगवान प्रवाहामुळे अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचावमोहीम सुरू आहे. नेपाळच्या लष्कराने प्रभावित भागात धडक मोहीम राबवत २५० हुन अधिक नागरिकांची सुटका केली आहे.
30 हून अधिक पूल वाहून गेले
या पुराचा सर्वाधिक फटका वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेला बसला आहे. सरकारी माहितीनुसार, ३५ मोठे पूल आणि ४५ झुलते पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक दुर्गम भागांचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे.
पुराच्या तडाख्यात १३ जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झाल्याने मदत पोहोचवण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. (Nepal flood latest news)
139 भारतीय नागरिकही बेपत्ता?
या नैसर्गिक आपत्तीत अनेक भारतीय नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 139 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या शोधासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळमधील महापुरामागे नेमकं कारण काय? (Nepal Floods)
या महापुरामागील कारण आणखी धक्कादायक असल्याचं सांगितलं जात आहे. तिबेटच्या दिशेने झालेल्या मोठ्या हिमस्खलनामुळे ल्हेंदे नदीचा प्रवाह अडवला गेला. नदीचा प्रवाह थांबल्याने त्या ठिकाणी पाण्याचा मोठा साठा तयार झाला.
या नैसर्गिक अडथळ्यामुळे तयार झालेला पाण्याचा साठा अचानक मुक्त झाल्यानंतर त्याचा प्रचंड वेगाने प्रवाह खालील दिशेने आला. परिणामी त्रिशुली आणि भोटेकोशी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आणि आसपासच्या परिसरात विध्वंसक पूरस्थिती निर्माण झाली.
या भागात झालेल्या 4.4 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे हिमस्खलन झालं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या घटनेमागील नेमकी कारणसाखळी निश्चित करण्यासाठी सविस्तर तपास आणि भौगोलिक विश्लेषण आवश्यक आहे.
भारतातही प्रशासन अलर्ट
नेपाळमधील पुराचा परिणाम भारतातील सीमावर्ती भागांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही प्रशासन सतर्क झालं आहे.
गंडक, नारायणी आणि कोसी नद्यांच्या पाणीपातळीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगरसह बिहारमधील संवेदनशील भागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बिहारमधील सहा जिल्ह्यांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयासह संबंधित केंद्रीय यंत्रणांकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन
नेपाळमधील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भारत नेपाळच्या या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी असून आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन मोदी यांनी दिलं आहे.
नेपाळमधील या आपत्तीने पुन्हा एकदा हिमालयीन भागातील नैसर्गिक आपत्तींच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधलं आहे. हिमस्खलन, भूकंप आणि अचानक वाढणारा नदीचा प्रवाह यांचा एकत्रित परिणाम किती विनाशकारी ठरू शकतो, याचं हे गंभीर उदाहरण मानलं जात आहे.




