Pune Ganesh Visarjan DJ : उत्सव डिजिटल होतोय की उद्ध्वस्त? परंपरा जपली जातेय की नियमांना केराची टोपली दाखवली जातेय? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. निमित्त आहे पुण्याची जगप्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणूक… पण यंदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची चर्चा ढोल-ताशांच्या गजरानं नाही, तर डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं होतेय. आणि या सगळ्या थयथयाटात सर्वात धक्कादायक चित्र काय होतं माहित आहे? ज्या खाकी वर्दीवर नियम राखण्याची जबाबदारी होती, ते पुण्याचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस स्वतः डीजेच्या समोर कानात हेडफोन घालून बसले होते, पाहूयात पुण्यात डीजेचा दणदणाट… खाकी हतबल की मंडळांची मनमानी?
मिरवणूक सुरू होण्यापूर्वी पुणे पोलीस प्रशासनाने नियमांचा मोठा डंका पिटला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक घेऊन कडक नियमावली जाहीर केली होती. काय होते ते नियम?
१. प्रत्येक मंडळाला डीजेसाठी ४ बेस आणि ४ टॉपचीच मर्यादा असेल.
२. लेझर लाईट्स आणि हाय-कॅपॅसिटी साऊंड सिस्टमवर पूर्ण बंदी असेल.
३. मुख्य चौकात मंडळांना सादरीकरणासाठी फक्त १० मिनिटांचा वेळ दिला जाईल.
पण मिरवणूक सुरू झाली आणि पोलिसांची ही नियमावली फक्त कागदावरच राहिली. ४ बेस आणि ४ टॉपचा नियम वाऱ्यावर उडवून मंडळांनी डीजेचे अक्षरशः डोंगर उभे केले होते. लेझर बंदीचे आदेश हवेत विरले आणि पुण्याच्या रस्त्यांवर डीजेचा असा काही उत आला की मागच्या दोन वर्षांचे रेकॉर्ड मोडीत निघाले. डेसिबल मीटरने १०४.५ डेसिबलची पातळी ओलांडली. म्हणजेच, पुण्यात कायदा मंडळांचा चालत होता की पोलिसांचा? हा पहिला मोठा प्रश्नचिन्ह आहे.
104.5 डेसिबलपर्यंत ध्वनीपातळी कशी पोहोचली? ( Ganpati Visarjan DJ )
आता येऊयात त्या मुख्य दृश्याकडे, ज्याने सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत खळबळ उडवून दिली. साऊंड सिस्टम समोर पोलीस आयुक्त हेडफोन लावून बसले. नेटकऱ्यांनी विचारलं, साहेब, जनतेचे कान फुटत असताना तुम्ही स्वतःचे कान बंद करून घेणार का? “नियम मोडणाऱ्यांचे डीजे जप्त करायचे सोडून पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत? पण या चित्रामागचं एक वेगळं तांत्रिक कारणही समोर आलंय.
या व्हायरल व्हिडिओवर गदारोळ माजल्यानंतर स्वतः पोलीस प्रशासनाने आणि आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं. अलका टॉकीज चौकात साऊंड सिस्टमचा आवाज इतका भयानक होता की, पोलिसांच्या वायरलेस सेटवरून येणारे संदेश आणि नियंत्रण कक्षाकडून मिळणाऱ्या सूचना ऐकू येणे अशक्य झाले होते. मिरवणुकीत लाखो भाविकांची सुरक्षा, व्हीआयपींची हालचाल आणि ३४ हून अधिक रुग्णवाहिकांना गर्दीतून मार्ग काढून देणे गरजेचे होते. अंतर्गत संवाद स्पष्ट ऐकू यावा आणि आजूबाजूचा गोंधळ ब्लॉक व्हावा, यासाठीच अधिकाऱ्यांनी ते विशेष इयरप्लग्स आणि हेडफोन्स लावले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात मुलांची लग्नं का होत नाहीत? हजारो तरुण अविवाहित; नेमकं कारण काय?
DJ आणि ध्वनीप्रदूषणावर पोलिसांची कारवाई ( Pune Ganesh Visarjan DJ )
दावा काहीही असो, पण यंदा पुण्यात डीजेला आलेला उत मागच्या दोन वर्षांपेक्षा भयानक होता हे नाकारता येणार नाही. यंदा डीजेवर केवळ पारंपारिक गाणी नव्हती, तर अश्लील हावभाव आणि शिवराळ गाण्यांवर तरुणाई थिरकत होती, ज्याने पुण्याच्या सुजाण संस्कृतीला धक्का बसला. याच ध्वनिप्रदूषणाविरोधात पुण्यातल्या नागरिकांनी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येत डीजे मुक्त पुण्यासाठी मोर्चा काढला होता.
याच वादात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट आणि पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बापट आणि सुजाण पुणेकरांचा वाद हा आहे की, जर न्यायालय आणि संविधानाने ध्वनी मर्यादा आखून दिली आहे, तर राजकीय वरदहस्त लाभलेली सार्वजनिक मंडळे या नियमांना भीक का घालत नाहीत? सामान्य रुग्ण, लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबणार कधी?
असं नाही की पोलिसांनी काहीच केलं नाही. मिरवणूक संपल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आकडेवारी जाहीर केली. विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ हून अधिक सार्वजनिक मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि तब्बल ४०० हून अधिक प्रकरणांमध्ये ध्वनी नियमांचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात अनेक डीजे मिक्चर्स, कन्सोल आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. पण प्रश्न हा पडतो की, ही कारवाई गुन्हे घडताना का झाली नाही? मिरवणूक सुरू असतानाच हे डीजे का थांबवले गेले नाहीत? पोलिसांना मिरवणुकीचा वेळ वाढण्यापेक्षा कायदा राखणे महत्त्वाचे का वाटले नाही?
विसर्जन मिरवणुकीत किती प्रकरणे दाखल झाली? ( Pune Ganesh Visarjan 2026 )
पुण्याची विसर्जन मिरवणूक तब्बल ३३ तास चालली. मिरवणूक शांततेत पार पडली, कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही, याबद्दल पुणे पोलिसांचे नक्कीच कौतुक करायला हवे. पण पोलिसांचे ते हेडफोन लावलेले चित्र एका मोठ्या लाचारीचे प्रतीक बनले आहे. ते चित्र ओरडून सांगत होते की, कायद्याचे रक्षकच आज आवाजाच्या समोर हतबल झाले आहेत. आज सामान्य जनता पुणे प्रशासन, राजकीय नेते आणि सार्वजनिक मंडळांना काही रोकठोक प्रश्न करत आहेत
जर पोलीस आयुक्तांना मेसेज ऐकण्यासाठी हेडफोन लावावे लागत असतील, तर रस्त्यावर उभे असलेल्या सामान्य पोलिसांच्या आणि नागरिकांच्या कानांचे काय? ४ बेस आणि ४ टॉपचा नियम तोडणाऱ्या मंडळांवर ऑन-द-स्पॉट कारवाई करण्याची हिंमत खाकी वर्दीत का नव्हती? राजकीय दबावामुळे पोलीस हात बांधून उभे होते का? गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला आम्ही भक्तीचा उत्सव ठेवणार आहोत की डीजे ऑपरेटरच्या मग्रुरीचा अड्डा बनवणार आहोत? पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येणार आहेत, पण जर हेच चित्र राहिलं तर पुण्याची सांस्कृतिक ओळख नक्कीच धोक्यात येईल अशी चर्चा होतेय…









