Breaking News :
महाराष्ट्र

दुष्काळात विखेंचा फॉर्म्युला ‘लग्न साधे करा तरीही पोरं होतात’

Vikhe Patil Wedding Statement
39

Vikhe Patil Wedding Statement : सध्या दुष्काळ चालू आहे त्यामुळं लग्न साध्या पद्धतीने करा, साध्या पद्धतीने लग्न केलं तरी पोरं होतात…. हे विधान केलंय महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी… विखे पाटलांच्या या विधानाने सध्या सोशल मीडियापासून ते थेट गावाकडच्या चावडीपर्यंत मोठी चर्चा घडवून आणली आहे.  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांनी जनतेला साधेपणाने लग्न करण्याचे आवाहन करताना एक थेट सवाल केला कि, कोव्हिड काळात केवळ १०-१५ लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने जी लग्ने झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का?, दुष्काळात शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करायच्या सोडून विखे पाटील म्हणताहेत दुष्काळ आहे म्हणून लग्न साधे करा……

‘साध्या पद्धतीने लग्न करा, तरीही पोरं होतात’

महाराष्ट्रात अनेक भागांत दुष्काळ निर्माण झालाय, राज्य सरकारने 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केलाय, शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीतही, समाजात पत राखण्यासाठी किंवा लोक काय म्हणतील? या भीतीने अनेक कुटुंबे कर्ज काढून लग्नांवर लाखो रुपये खर्च करतात.

अहिल्यानगरसारखा ग्रामीण परिसरात अंदाजानुसार,साधे लग्न करायचे म्हटले तरी किमान ७ ते १० लाख रुपये खर्च येतो. अनेकदा हा खर्च करण्यासाठी शेतकऱ्याला बँकेकडून किंवा सावकाराकडून जास्त व्याजाने कर्ज घ्यावे लागते. लग्न तर एका दिवसात संपते, पण त्याचे कर्ज फेडण्यात पुढची १० वर्षे निघून जातात. अनेक शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये ‘मुलीच्या लग्नाचे कर्ज’ हे एक प्रमुख कारण समोर आले आहे. विखे पाटील यांच्या आवाहनामागे हीच भीषण सामाजिक परिस्थिती आहे.  लग्नातील वाढत्या खर्चावर बोचरी टीका करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,”कोविडच्या काळात लग्न कसे झाले? 10 लोकांत लग्न झाले, 50 लोकात लग्न झाले. त्यांना पोरं झाली नाहीत का?” असा थेट सवाल त्यांनी मंचावरून उपस्थित केला. समाजात दाखवला जाणारा खोटा मोठेपणा आणि भव्य सोहळ्यांची परंपरा यावर त्यांनी कडक शब्दांत बोट ठेवले.

हेही वाचा : महाराष्ट्रात मुलांची लग्नं का होत नाहीत? हजारो तरुण अविवाहित; नेमकं कारण काय?

लग्नातील डामडौल आणि वाढत्या खर्चाचा मुद्दा ( Simple Wedding )

मात्र जेव्हा नेते किंवा महाराज स्वतःच्या कुटुंबात कोट्यवधींचे विवाह सोहळे करतात आणि गरिबांना साधेपणाचे सल्ले देतात, तेव्हा त्या आवाहनाची तीव्रता कमी होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वापरलेले शब्द कदाचित अनेकांना खटकणारे किंवा विनोदी वाटू शकतात, पण त्यामागील सामाजिक संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. कोव्हिड काळाने आपल्याला शिकवले आहे की, लग्न अगदी मोजक्या लोकांमध्येही अत्यंत आनंदाने पार पडू शकते. मात्र यावर आता दोन गट निर्माण झाले आहेत , काही नागरिकांनी राजकारण्यांवरच निशाणा साधला आहे. सामान्य जनतेला साधेपणाचे आवाहन करणारे नेते स्वतःच्या घरातील लग्नसमारंभ आणि राजकीय सोहळे इतक्या साधेपणाने पार पाडणार का? असा उलट सवाल काही युजर्स करत आहेत.

एका ज्येष्ठ मंत्र्याने जाहीर मंचावरून कौटुंबिक आणि जैविक संदर्भ देऊन साधे लग्न झालेल्यांना पोरं झाली नाहीत का? असा प्रश्न विचारल्यामुळे हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारने पाणी नियोजन, कर्जमाफी किंवा हेक्टरी मदत जाहीर करणे अपेक्षित असते. परंतु, दुष्काळापासून बचावाचा मार्ग म्हणून थेट लग्नाचा खर्च कमी करण्याचा सल्ला देणे लोकांना थोडे अजबच आहे, संजय राऊतांनी सुद्धा याच्यावर टीका करतांना म्हटलंय कि, तुमच्या सारख्या श्रीमंतांनी आधी हे लक्षात ठेवावं..

कोविड काळातील लग्नांचा विखे पाटलांनी दिला दाखला ( Vikhe Patil Wedding Statement )

जाहीर मंचावरून “कोव्हिड काळात लग्ने झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का?” असा युक्तिवाद करणे अत्यंत असंवेदनशील आणि पोरकटपणाचे लक्षण मानले गेले आहे. दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बोलताना एका राज्याच्या ज्येष्ठ मंत्र्याने अधिक परिपक्व आणि संवेदनशील भाषा वापरणे गरजेचे होते. या विधानामुळे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाल्याची भावना काही वर्गांतून व्यक्त होत आहे.लग्नसमारंभ हा केवळ डामडौल नसतो, तर त्यातून हजारो हातांना रोजगार मिळतो. मंडपवाले, केटरर्स, बँड पथक, फुलवाले, फोटोग्राफर, कपडे आणि दागिने विक्रेते अशा अनेक छोट्या व्यावसायिकांचे कुटुंब या लग्नसराईवर अवलंबून असते. जर सर्वांनीच लग्ने पूर्णपणे बंद किंवा अत्यंत साधी केली, तर आधीच मंदी आणि दुष्काळाने होरपळलेल्या या सेवा क्षेत्रातील गरिबांचे आर्थिक कंबरडे मोडेल. शेतकरी कर्जबाजारी का होतो? कारण त्याला त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही आणि वेळेवर शासकीय मदत मिळत नाही. मूळ आर्थिक संकट हे चुकीच्या कृषी धोरणांमुळे असताना, शेतकरी केवळ लग्नाच्या खर्चामुळेच अडचणीत येतोय, असं भासवण्याचा प्रयत्न झाला का ?

शेवटी, पण लग्न म्हणजे दोन मनांचे आणि कुटुंबांचे मिलन असते, संपत्तीचे प्रदर्शन नाही. दुष्काळाच्या काळात विखे पाटलांनी दिलेला हा सल्ला जर आपण गांभीर्याने घेतला, तर अनेक कुटुंबे कर्जबाजारी होण्यापासून वाचू शकतात.  तुम्हाला काय वाटतंय विखे पाटलांचे हे विधान योग्य आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts