Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देशात अदानींचं साम्राज्य! जमिनीपासून आकाशापर्यंत विस्तार; राज ठाकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले?
देश

देशात अदानींचं साम्राज्य! जमिनीपासून आकाशापर्यंत विस्तार; राज ठाकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले?

Adani Empire in India | Gautam Adani
31

Adani Empire in India : उद्योगपती गौतम अदानी यांचं साम्राज्य आज जमिनीपासून आकाशापर्यंत पाहायला मिळत आहे…गौतम अदानी यांचा देशातील वाढता विस्तार याच्यावर आजच्या गर्जना मोर्चातून राज ठाकरेंनी टीका केली…तसंच काही महिन्यांपूर्वी देखील राज ठाकरेंनी देशात सुरू असलेली हूकमशाही आणि अदानीशाही याच्यावर भाष्य केलं होतं…राज ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं, त्यामध्ये त्यांनी दाखवलं की देशात फक्त गुजरातमध्ये असणारे अदानी कसे देशभर पसरले…कसं त्यांच्या ताब्यात आज देशात सर्व गोष्टी आहेत…पाहूयात की देशात खरंच हूकूमशाही सुरू आहे का? अदानींमुळे दुसरे उद्योगपती उद्ध्वस्त झाले आहेत का? अदानींमुळे छोट्या उद्योगांना संपवलं जातंय का?

राज ठाकरेंनी अदानी समूहावर काय आरोप केले? ( Adani Empire in India )

राज ठाकरेंनी आजच्या मोर्चातून देशात कसं एकाच उद्योगपतीचं साम्राज्य वाढवलं जातंय….देशात कसं एकाच उद्योगपतीला सर्व मालमत्ता दिल्या जात आहे, यावर भाष्य केलं…काही महिन्यापूर्वीही आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरेंनी एका प्रेझेंटेशनद्वारे अदानी समूहाचा 2014 नंतर झालेला प्रचंड विस्तार थेट पडद्यावर दाखवला… देशातील जमिनी, आकाश, विमानतळ, बंदरे आणि कोळसा खाणी यांसारख्या बहुतांश सार्वजनिक मालमत्ता एकाच उद्योगपतीच्या घशात घातल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता…

काँग्रेसच्या प्रदीर्घ काळात टाटा, बिर्ला, अंबानी आणि इतर अनेक मोठे उद्योग समूह उभे राहिले आणि त्यांनी देशाच्या औद्योगिक विकासात स्पर्धात्मक योगदान दिले… मात्र, सध्याच्या सरकारच्या काळात केवळ एकाच उद्योगपतीला अवाजवी प्राधान्य देऊन मोठे केले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी गर्जना मोर्चातून केला… याशिवाय, जनमानसातील असंतोष आणि सत्य बातम्या लोकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे यंत्रणेच्या दबावाखाली असल्याचा खळबळजनक दावाही राज ठाकरेंनी केला..

हेही वाचा : Apple Pay ची एन्ट्री अन् UPI वर MDR! भारताच्या डिजिटल पेमेंटमध्ये नेमकं काय बदललं?

2014 नंतर अदानी समूहाचा विस्तार किती वाढला?

मात्र देशात सुरू असलेल्या अदानीशाही बाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे…1988 मध्ये अदानी समुहाची सुरूवात एका छोट्या कमोडिटी ट्रेडिंग फर्म म्हणून झाली… 1990 च्या दशकात त्यांनी मुंद्रा बंदराचा विकास सुरू केला..यावेळी ते हळूहळू उद्योग जगतात यशस्वी होत पुढे जात होते…मात्र ऑक्टोबर 2001 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अदानींचे नशीब बदलल्याची चर्चा आहे…याच काळात अदानी समूहाने बंदरांसोबतच ऊर्जा, कोळसा खाण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी झेप घेतल्याची माहिती आहे…मोदींच्या मुख्यमंत्री कार्यकाळात अदानी समुहाचा विकास होत गेला आणि 2008 मध्ये पहिल्यांदा फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले, अशीही चर्चा आहे… तेव्हा त्यांची संपत्ती सुमारे 9.3 अब्ज डॉलर्स होती, अशी माहिती आहे…त्यानंतर अदानी समुहाचा विकास होतच गेला…मात्र अदानी हे जगातील टॉप 10 च्या यादीत जाऊ शकले नाही…..मात्र हे त्यांचे स्वप्न 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि यानंतर काहीच महिन्यानंतर पूर्ण झाले…

अदानी पोर्ट्स ( Adani Ports ) अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही केवळ भारतातील सर्वात मोठी खाजगी बंदर ऑपरेटर कंपनी नसून, ती देशाच्या एकूण सागरी व्यापाराचा कणा मानली जाते. भारताच्या एकूण सागरी मालवाहतुकीपैकी जवळपास 27% ते 28% माल एकट्या अदानी पोर्ट्सद्वारे हाताळला जातो..गुजरातच्या कच्छच्या आखातात असलेले मुंद्रा बंदर हे अदानी समूहाचे ‘फ्लॅगशिप’ म्हणजेच मुख्य बंदर आहे…अदानींकडे देशभरात प्रमुख 15 बंदरे आणि टर्मिनल्स आहेत…तसंच परदेशात हायफा बंदर (इस्रायल), कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल (श्रीलंका), दार एस सलाम बंदर – कंटेनर टर्मिनल 2 (टांझानिया), नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनल / ॲबॉट पॉइंट (ऑस्ट्रेलिया) हे बंदर अदानीकडे असल्याची माहिती आहे…

विमानतळ क्षेत्रात अदानींचा किती विस्तार? ( Adani Ports )

हवाई क्षेत्रात कोणताही पूर्वअनुभव नसताना अदानी समूहाने 2019 नंतर थेट प्रवेश केला… केंद्र सरकारने विमानतळांच्या खाजगीकरणाचा निर्णय घेतला…हा निर्णय अदानींना फायदा पोहोचवण्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप आहे…त्यानंतर, अहमदाबाद, लखनौ, जयपूर, मंगळुरू, तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी या प्रमुख विमानतळांची कंत्राटे अदानी समूहाने जिंकली… तसंच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे विमानतळ असलेल्या ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा’चा ताबाही मूळ प्रवर्तक जीव्हीके समूहाकडून अदानी समूहाकडे गेला… आज देशातील हवाई प्रवाशांच्या व्यवस्थापनात आणि विमानतळ महसुलात या समूहाचा वाटा अफाट आहे…

छोट्या कमोडिटी ट्रेडिंग फर्म पासून सुरू केलेल्या अदानी ( Gautam Adani ) समूहाने पोर्ट, हवाई क्षेत्रानंतर ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे…अदानी समुहाच्या ताब्यात सध्या मुंद्रा वीज प्रकल्प (गुजरात), तिरोडा वीज प्रकल्प (महाराष्ट्र – गोंदिया जिल्हा), कवाई वीज प्रकल्प (राजस्थान), उडुपी वीज प्रकल्प (कर्नाटक), गोड्डा वीज प्रकल्प (झारखंड), रायपूर वीज प्रकल्प (छत्तीसगड), कोरबा वीज प्रकल्प (छत्तीसगड), सिंगरौली वीज प्रकल्प (मध्य प्रदेश), डहाणू वीज प्रकल्प (महाराष्ट्र – पालघर), मुथियारा वीज प्रकल्प (तमिळनाडू) हे वीज प्रकल्प सध्या अदानींच्या ताब्यात असल्याची माहिती आहे… हरित ऊर्जा प्रकल्प, कोळसा खाणी यात देखील अदानी समुहाचा मोठा वाटा आहे…कोळसा खाणी तर विदेशातही आहेत…

अदानी समूहाने सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपन्या जशा की एसीसी आणि अंबुजा सिमेंट अचानक खरेदी करून देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सिमेंट उत्पादक बनण्याचा बहुमान मिळवला… यासोबतच खाद्यतेल , डेटा सेंटर्स, संरक्षण क्षेत्रांतर्गत ड्रोन निर्मिती आणि पेट्रोकेमिकल्स यांसारख्या विविध क्षेत्रांत अदानी समूहाने आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत… माध्यम क्षेत्रातही एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे आणि इतर डिजिटल मीडिया समूहांचे अधिग्रहण करून त्यांनी थेट प्रवेश केला…यामध्ये ईडी आणि सीबीयाचा मोठा रोल मानला जात आहे…आधी ईडी आणि सीबआयने छापे टाकले आणि त्यानंतर काही दिवसांनी अदानींनी ते खरेदी केले…

हेही वाचा : उजनी धरणावर AI डेटा सेंटर उभारणार! ‘तीन जिल्ह्यांचं वाटोळं? काय आहे तो प्रोजेक्ट?

अदानींची संपत्ती अंबानींपेक्षा जास्त झाली का? ( Adani Group )

2014 नंतर अदानींचा जेवढा विकास झाला , तेवढा इतर उद्योगपतींचा झालेला दिसत नाही…अदानींची संपत्ती थेट 1500 टक्कांनी वाढली आहे…मात्र इतर उद्यागपतींची संपत्ती दरवर्षी जशी हळूहळू वाढते तशीच वाढताना दिसत आहे…आज इतर उद्योगपतींना केंद्र सरकारकडून हवीतशी साथ आणि मदत मिळत नसल्याची चर्चा आहे…मुकेश अंबानी यांची संपत्ती 2014 मध्ये जवळपास 23.6 अब्ज डॉलर्स होती अशी माहिती आहे…मात्र 2026 मध्ये त्यांची संपत्ती वाढून 86.3 अब्ज डॉलर्स झाली आहे…तर अदानींची संपत्ती थेट 112.7 अब्ज डॉलर्स झाली आहे…म्हणजे ज्या अदानींचे नाव 2014 पर्यंत जास्त कुणाला माहितीही नव्हते, त्याच अदानींनी अंबानींना मागे टाकत पुढे गेले आहेत…सध्या देशातील काही उद्योगपती मोदी सरकार विरोधात नाराज असल्याची चर्चा आहे..हे उद्योगपती इंडिया आघाडीसोबत जूळवून घेत असल्याची माहिती आहे…

भारतात 2014 नंतर अनेक उद्योग बंद पडल्याची माहिती आहे… अधिकृतपणे बंद पडलेल्या उद्योगाबाबत सरकार संसदेत आणि विविध संघटनांनी अहवालांद्वारे महत्त्वाची आकडेवारी मांडली आहे… केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, केवळ 2020 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीत देशभरात २,०४,२६८ खाजगी कंपन्या बंद झाल्या आहेत, अशी माहिती आहे….याशिवाय, देशातील लघू आणि मध्यम उद्योगांचा विचार केला, तर सरकारी उद्यमी पोर्टलच्या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत 75,000 हून अधिक नोंदणीकृत लघू उद्योग बंद पडले आहेत.. ज्यामध्ये एकट्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वाधिक म्हणजेच ३५,००० पेक्षा जास्त उद्योगांनी गाशा गुंडाळला आहे…. अखिल भारतीय व्यापार मंडळासारख्या खाजगी संघटनांचा दावा याहून अधिक चिंताजनक असून, त्यांच्या मते प्रतिकूल आर्थिक धोरणे, वाढता कर आणि कोविड-१९ नंतरच्या परिस्थितीमुळे गेल्या ८ ते १० वर्षांत ज्यांची नोंदणी झालेल्या नाही अशा छोट्या पारंपारिक उद्योगांना टाळे लागले आहे… आता या कंपन्या बंद का पडल्या असा सवाल निर्माण झालाय…अदानी समुहामुळे यातील काही कंपन्या बंद पडल्या नाहीत ना? असा संशय उपस्थित केला जातोय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts