Captain Smit Machchhar : दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लाईदुबई’ कंपनीचा विमान हायजॅक झाल्याची माहिती समोर आली आणि जगभरात एकच खळबळ उडाली…सह पायलटने मुख्य पायलटवर थेट चाकूने हल्ला केला…आरोपी पायलट दुसऱ्या पायलटवर हल्ला करून विमान हायजॅक करण्याचा प्लॅन करत होता, असा आरोप आहे…मात्र मुख्य पायलटने जीवाची परवा न करता सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहे…अत्यंत गंभीर जखमी अवस्थेतही संपूर्ण विमानाला क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार सध्या जगभरात कौतुकाचा विषय बनले आहेत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह जगभरातील नेत्यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलाम केला असून त्यांना खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल हिरो’ असे संबोधित केले आहे… विमानात नेमके काय घडलं, सह-वैमानिकाचा कट काय होता, कॅप्टन स्मित यांनी रक्ताच्या थारोळ्यात असूनही प्रवाशांचे प्राण कसे वाचवले आणि यावर जागतिक स्तरावरून काय प्रतिक्रिया आल्या…स्मित मच्छार मुळचे कुठले आहेत?
Flydubai FZ1073 विमानात नेमकं काय घडलं?
फ्लायदुबईचे फ्लाइट क्रमांक FZ1073 ने नेहमीप्रमाणे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्रायलची राजधानी तेल अवीवसाठी उड्डाण केले होते… विमानामध्ये 174 प्रवासी आणि क्रू मेंबर्स असा एकूण 180 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते… विमानाचे मुख्य नियंत्रण मूळचे मुंबईचे असलेले आणि उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्या हातात होते, तर त्यांच्या सोबत ओमानचा एक सह-वैमानिक कॉकपिटमध्ये उपस्थित होता… सुरुवातीचा प्रवास अत्यंत शांत आणि सामान्य पद्धतीने सुरू होता…विमान हवेत स्थिर झाल्यानंतर प्रवाशांनाही या मोठ्या संकटाची थोडीशीही कल्पना नव्हती…
विमान जेव्हा उंचावर प्रवास करत होते, तेव्हा अचानक कॉकपिटमध्ये ओमानच्या सह-वैमानिकाने अचानक उग्र रूप धारण केले… त्याने विमानाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न केला… त्याला हे विमान क्रॅश करायचे होते, असा आरोप आहे… जेव्हा कॅप्टन स्मित मच्छार यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या हल्लेखोर सह-वैमानिकाने आपल्याजवळ लपवून ठेवलेला तीक्ष्ण चाकू काढला आणि कॅप्टन स्मित यांच्यावर थेट जीवघेणा हल्ला केला… त्याने कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकूने सपासप वार केले… हा हल्ला इतका भयंकर होता की कॅप्टन स्मित यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही… कॉकपिटमध्ये काही सेकंदांतच रक्ताचे सडे उडाले… कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले आणि प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे शरीर कमकुवत होऊ लागले..
हेही वाचा : बापाचा मृतदेह 4 वर्षे फ्रीझरमध्ये! ‘पुन्हा जिवंत होतील’ या आशेने मुलांनी काय केलं?
174 प्रवाशांचे प्राण कसे वाचले? ( Captain Smit Machchhar )
अशा गंभीर हल्ल्यात एखादी व्यक्ती शुद्ध हरपते किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढते… परंतु, कॅप्टन स्मित यांना जाणीव होती की जर त्यांनी आता हार मानली, तर विमानातील निष्पाप प्रवाशांचा मृत्यू निश्चित आहे… प्रचंड वेदना होत असताना आणि रक्ताच्या थारोळ्यात असतानाही कॅप्टन स्मित मच्छार यांनी धाडस दाखवलं… त्यांनी पूर्ण ताकदीनिशी हल्लेखोर सह-वैमानिकाला विमानाचे मुख्य कंट्रोल घेण्यापासून रोखून धरले… एका बाजूला स्वतःचे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत त्यांनी दुसऱ्या बाजूने कॉकपिटचा आपत्कालीन दरवाजा अनलॉक केला…आधुनिक विमानांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव कॉकपिटचा दरवाजा आतून लॉक असतो, ज्यामुळे बाहेरून कोणीही आत येऊ शकत नाही… कॅप्टन यांनी दाखवलेले हेच प्रसंगावधान विमानासाठी संजीवनी ठरली…
कॉकपिटचा दरवाजा उघडताच, प्रवासी आणि फ्लायदुबईचेच क्रू मेंबर्सनी आत धाव घेतली…आतले दृश्य अंगावर काटा आणणारे होते… कॅप्टन स्मित रक्ताने माखलेले होते आणि हल्लेखोर सह-वैमानिक विमानावरील पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता… आत आलेल्या ऑफ-ड्यूटी पायलट्सनी आणि क्रू मेंबर्सनी मिळून तातडीने त्या हल्लेखोर ओमानच्या सह-वैमानिकाला पकडले आणि त्याला कॉकपिटच्या एका बाजूला नेले… त्यानंतर प्रवासी असलेल्या पायलट्सनी विमानाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले, अशी माहिती आहे….
विमानावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर, तात्काळ जवळच्या विमानतळाशी संपर्क साधण्यात आला… विमानाचे सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर यशस्वीरीत्या आपत्कालीन लँडिंग करण्यात आले… विमान जमिनीवर उतरताच सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोर सह-वैमानिकाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली… दुसरीकडे, कॅप्टन स्मित मच्छार ( Smit Machchhar ) यांना तातडीने ताबूक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले… त्यांच्या शरीरातून खूप रक्त वाहून गेले होते, मात्र डॉक्टरांच्या पथकाने अथक प्रयत्न करून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली, अशी माहिती आहे… सध्या मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन स्मित मच्छार यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून त्यांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत आहे… त्यांचा परिवारही मुंबईहून सौदी अरेबियाला पोहोचला असून भारत सरकार सौदी आणि युएई प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे… विमानातील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत…
PM मोदी आणि नेतान्याहू यांनी काय म्हटलं? ( Smit Machchhar )
या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया पायलट स्मित यांचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे… पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, कॅप्टन स्मित मच्छार हे खऱ्या अर्थाने ‘हिरो’ आहेत… मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असताना आणि स्वतः गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी जे शौर्य, मानसिक धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली, ती अद्वितीय आहे… त्यांनी केवळ स्वतःचा जीव वाचवला नाही, तर निष्पाप प्रवाशांचे प्राण वाचवले आहे… संपूर्ण भारताला कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याचा सार्थ अभिमान आहे… ते लवकर बरे व्हावेत, त्यांना नवशक्ती मिळो आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना…
हे विमान दुबईहून इस्रायलला जात असल्यामुळे त्यात इस्रायली नागरिकही प्रवाशांच्या रूपात होते… त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही कॅप्टन स्मित यांच्या साहसाची विशेष दखल घेत त्यांच्या शौर्याला अधिकृतरीत्या सलाम केला… नेतान्याहू यांनी म्हटले की, कॅप्टन स्मित मच्छार यांनी जे केले ते अद्भूत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, एका आत्मघाती हल्ल्यासारख्या प्रसंगाला तोंड देत त्यांनी विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवले… इस्रायल सरकार आणि येथील जनता कॅप्टन स्मित यांची नेहमी ऋणी राहील, ते जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील एक खरे नायक आहेत…
Flydubai प्रकरणाचा पुढील तपास काय सांगतो?
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यामुळे प्रवाशांचे प्राण जरी वाचले असले, तरी या घटनेने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणेला हादरवून सोडले आहे… कठोर सुरक्षा तपासणी असतानाही सह-वैमानिकाकडे कॉकपिटच्या आत चाकू कसा उपलब्ध झाला, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे… या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फ्लायदुबईने इस्रायलसाठीच्या आपल्या विमान सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत… आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून या संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू असून आगामी काळात वैमानिकांच्या मानसिक आरोग्य चाचण्या आणि कॉकपिटच्या सुरक्षा नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे…
कॅप्टन स्मित मच्छार ( Smit Machchhar ) यांनी रक्ताच्या थारोळ्यात असूनही जे धाडस दाखवले, ते मानवतेचे आणि शौर्याचे सर्वोच्च उदाहरण होते… जर त्यांनी त्या गंभीर जखमी अवस्थेत विमानाचा ताबा सोडला असता किंवा कॉकपिटचा दरवाजा उघडला नसता, तर आज जगाला एका मोठ्या विमान अपघाताच्या दुःखाला सामना करावा लागला असता… कॅप्टन स्मित यांनी स्वतःच्या रक्ताने प्रवाशांच्या आयुष्याची नवी गोष्ट लिहिली असून भारताच्या या वीर सुपुत्राला आज संपूर्ण जग सलाम करत आहे…






