Sangli Windmill Security Guard Murder : पवनचक्कीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात आनंद गुजले (वय ४०) यांचा मृत्यू झाला असून, प्रकाश गुजले हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांचेही पाय दोरीने बांधून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सांगलीत पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, रेवणगाव हद्दीतील पठार परिसरात पवनचक्क्यांच्या सुरक्षेसाठी हे दोघे सुरक्षा रक्षक तैनात होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला (Windmill Security Guard Attack) केला. यावेळी दोघांचे पाय दोरीने बांधून त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात आनंद गुजले यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश गुजले गंभीर जखमी झाले.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास अन्य सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचले असता दोघेही पाय बांधलेल्या अवस्थेत पडलेले आढळून आले. घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी प्रकाश गुजले यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : पुण्यात न्यायालयाबाहेर गोळीबाराने खळबळ! एकाचा मृत्यू, एक जखमी; घटनास्थळी दोन पिस्तूल आढळले
केबल वायर चोरीच्या प्रयत्नातून हल्ला झाल्याचा संशय
प्राथमिक अंदाजानुसार, पवनचक्की परिसरातील केबल वायर चोरीच्या प्रयत्नातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून, विटा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे खानापूर तालुक्यात खळबळ उडाली असून, पवनचक्की परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.








