Fraudulent Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात गाजत असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या भोंदू बाबाच्या कचाट्यात बडे बडे राजकीय नेते सापडले आहेत. त्यात राज्य मंत्रिमंडळ काही मंत्रीही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, माजी मंत्री व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे हादेखील SIT च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्याची SIT मार्फत कसून चौकशी करण्यात आली आहे. तर अशोक खरात याच्या पेन ड्राईव्हमध्ये अनेक आक्षेपार्ह विडिओ समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
हे ही वाचा: Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांनी खरंच अनामिका कापली का? नेमकं काय आहे 2 सप्टेंबरच्या व्हायरल फोटोमागचं सत्य
खरात याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी निकटचे संबंध असल्याचे अनेक फोटो समोर आले. यावरुन राज्यात संताप व्यक्त होऊ लागला. चाकणकर कधी राजीनामा देणार अशी मागणी राज्यभरातून होत होती. अखेर लोकांच्या रेट्यापुढे चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. आता या प्रकरणात आणखी काही राजकीय नेते गोत्यात येण्याची शक्यता आहे. महायुतीतील सत्ताधारी, शिवसेने प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडडळातील मंत्र्यांच्या खास माणसाची , निकटवर्तीयाची SIT चौकशी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय
स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी झाली. दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे हा SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकला. SIT टीमने दीपक लोंढेची कसून चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक लोंढे हा सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भोंदू बाबा अशोक खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार आहेत. त्यामुळे यात आणखी किती, कोण लोक अडकणार, त्यात राजकीय नेते असणार का, काही मोठं भांडाफोड होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खरातला अटक करतेवेळी पाळण्यात आली होती गुप्तता
महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली खरात याला अटक करण्यात आली. मात्र ऑपरेशन कॅप्टन खरात वेळी कमालीची गुप्तता पाळण्यात आली अशी माहिती आता उघड झाली आहे. कारण पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना देखील संपूर्ण माहिती दिलेली नव्हती . कॅप्टन खरातचे विविध राजकीय नेत्यांशी असलेले संबंध पाहता, त्याला अटक करताना गुप्तता पाळण्यात आली. कॅप्टन खरात हा देशाबाहेर पळून जाण्याची पोलिसांना भीती होती, त्यामुळे खबरदारीचे हे पाऊल उचलण्यात आलं. त्यानुसार, खरात याला त्याच्या राहत्या बंगल्यातून रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.












