Satara doctor case : फलटन येथील महिला डाॅक्टरने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला असल्याची शंका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील त्यांनी काही खळबळजनक पुरावे देखील सादर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या या शंकांना अधिक वाव मिळाला आहे. त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसचा मुद्दा उपस्थित करून गंभीर प्रश्न पोलिसांना विचारले आहेत. पोलिस सांगतात की, आत्महत्या संध्याकाळी सात वाजता झाली. मग मृत्यूनंतर रात्री अकरा वाजता त्या महिलेने व्हॉट्सअॅप स्टेटस लाईक कसा केला? हा वेळेचा फरक कसा? म्हणूनच आमचा संशय पोलिसांवर संशय असल्याचा आरोप बुधवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन अंधारे यांनी केलाय.
“मी नुकताच डॉक्टर महिलेच्या बहिणीला आणि भावाशी संपर्क केला. तुम्ही वेळेबद्दल काहीतरी प्रश्न उपस्थित करत होत्या, असं मी त्यांना विचारलं. याबाबत बोलताना मला समजलं की सातारा डॉक्टरचे प्रकरण समोर आले त्या दिवशी डॉक्टर तरुणीच्या बहिणीने तिला कॉल केला होता. यावेळी डॉक्टर महिलेच्या बहिणीने केलाला फोन कॉल पोलिसांनी उचलला. तिला वाटले की माझ्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय. त्यामुळे तिने विचारलं माझ्या बहिणीचा फोन तुमच्याकडे कसा आला? त्यानंतर तिकडून सांगण्यात आलं की तुमच्या बहिणीने आत्महत्या केली. ही घटना संध्याकाळी सात वाजता घडली, असे सांगण्यात आले. पण मृत डॉक्टर महिलेच्या बहिणीने एक स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवलेले होते. तेच स्टेटस ११ वाजून ६ मिनिटांनी मृत डॉक्टरने लाईक केलेले आहे, असे अंधारे यांनी तपशीलवार सांगितले. तसेच डॉक्टर तरुणी मृत्यू अगोदरच झालेला असेल असे सांगितले जात असेल तर मृत डॉक्टर तरुणी रात्री अकरा वाजता स्टेटस लाईक कशी करू शकतो, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस काहीतरी लपवत आहेत
फलटणच्या डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे मात्र पोलीस काहीतरी लपवत आहेत, असा आम्हाला संशय आहे. तसेच युवतीच्या हातावरील आणि तिने लिहिलेल्या तक्रार पत्रातील हस्ताक्षर अजिबातच जुळत नसल्याचे सांगत हातावरील ‘निरीक्षक’ हा शब्द आणि तक्रार अर्जातील तोच शब्द यामध्ये तफावत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. आता आत्महत्या प्रकरणाचा गुंता निरीक्षक शब्द सोडविणार का? याकडे अंधारे यांनी लक्ष वेधले. हस्ताक्षर आणि शब्दातील फरक पाहता डॉक्टर युवतीची हत्या की आत्महत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे, असेही अंधारे म्हणाल्या.
‘पोलीस निरीक्षक’ हा शब्द नऊ
चार पानाच्या पत्रात ‘पोलीस निरीक्षक’ हा शब्द नऊ वेळा आला आहे. हे पत्र पाहिल्यावर असं समजतंय की त्यातील हस्ताक्षर आणि त्या महिलेच्या हातावर असलेली वेलांटी यामध्ये फरक आहे. पत्रात लिहिलेली ‘वेलांटी’ दीर्घ आहे, तर तिच्या हातावरील वेलांटी वेगळी आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या, याबाबत शंका घेण्यास वाव आहे. हस्ताक्षरही जुळत नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. मी हस्ताक्षराचा अहवाल मागवला आहे आणि तो दोन दिवसांत मला मिळेल, असे अंधारे म्हणाला.
हातावरील संदेश नेमका कुणी लिहिला
मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून फलटणच्या डॉक्टर युवतीने जीवन संपविल्याच्या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी नवनवे दावे करून खळबळ उडवून दिली आहे. तरुणीच्या हातावरील संदेश नेमका कुणी लिहिला, असा प्रश्न विचारीत हस्ताक्षर जुळत नसल्याकडे प्रकर्षाने लक्ष वेधले. आरोपींची चौकशी करायची सोडून त्यांना क्लिनचिट देण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी महिला आयोग आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न केल्याची टीकाही अंधारे यांनी केली.












