Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

‘तुमचा बाप जयराम चाटे येतोय’ रक्तरंजीत बीड, गुन्हेगारीची कीड!

Beed Crime News

Beed Crime News : गेल्या काही महिन्यांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्राला रडवलं. ती फक्त हत्या नव्हती, क्रूरतेचा कळस होता. त्यानंतर बीडमध्ये जनु गुन्हेगारीचं मोहोळ बसल्याचं आढळून आलं, जिथं दगड मारेल तिथून गुन्हेगारच बाहेर निघत होते. मग ते महादेव मुंडे हत्या प्रकरण असो..किंवा खोक्या उर्फ सतीश भोसलेचं प्रकरण असो…अशा गुन्हेगारीमुळेच बीड कायम चर्चेत राहिलं… आणि अर्थातच ही गुन्हेगारी नेते स्पॉन्सर असल्याची चर्चाही सुरूच राहिली, आता पुन्हा बीड एका रक्तरंजीत घटनेनं चर्चेत आलंय.

हेही वाचा – कामठी चाकू हल्ला प्रकरण आता ‘डबल मर्डर’; उपचारादरम्यान १७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला

बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात गुरुवारी पाच जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत असल्याचं तक्रारीत म्हटलंय… मारहाण करणारे हे जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांच्या टोळीतील असल्याची चर्चा आहे. पोलीस या सगळ्यांचा शोध घेत आहेत…

‘आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो’

‘तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय’, ‘आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो’, असं म्हणत हल्ला केला. यामध्ये तरूण संग्राम चाटे गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलिसात पाच आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याच्या भावाचे निधन झाल्याने अंत्यविधींसाठी त्याला काल तुरुंगाबाहेर सोडण्यात आले होते. यामुळे बीडमधील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची भीती निर्माण करण्यात आली होती. तसाच प्रकार तांबवा परिसरात घडल्याने आता पोलीस काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत…

कराड टोळीचं जेलमधूनही गुन्हेगारी साम्राज्य चालू

जयराम चाटेच्या भावाचे 2 मार्च रोजी निधन झाले होते. त्यानंतर केल्या जाणाऱ्या बाराव्याच्या विधीसाठी जयराम चाटे याला उपस्थित राहता यावे यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला 12 व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता. मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारी बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलीस बंदोबस्तात बाहेर पडला आणि त्याच्या मूळ तांबवा या गावी चाटेच्या भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी उपस्थित राहिला होता… मात्र त्याआधी हे मारहाण प्रकरण घडल्यानं पुन्हा वाद पेटलाय, वाल्मिक कराड आणि त्याची टोळी जेलमधूनही आपलं गुन्हेगारी साम्राज्य चालवत असल्याचा राजकीय आरोप अनेकदा झालाय आणि या प्रकरणानंतर या आरोपांना आणखी हवा दिलीय…

पोलीस नेमकं काय खाऊन झोपतात असा संतप्त सवाल

एके काळी बीडची ओळख ही वेगळी होती, मात्र अलिकडे काही दिवसांत जशी प्रकरण समोर आली आहेत, त्यानंतर हे बीड आहे की बिहार असा सवालही अनेकदा विचारला गेला. नेते आणि पोलिसांच्या आश्रयाने सुरू असलेली गुन्हेगारी डोईजड झाल्यानंतर पोलीस अधिकारी बदलण्यात आले, मात्र बीडची परिस्थिती काही बदलली नाही, कारण बीड पोलिसांना अजूनही महादेव मुंडेंचे आरोपी सापडत नाहीत, तर संतोष देशमुख खून प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे तीनवेळा घरी येऊन जातो, मात्र तरीही ते पोलिसांना सापडत नाहीत, त्यामुळे पोलीस नेमकं काय खाऊन झोपतात असा संतप्त सवाल आता बीडकर विचारतायत. पुन्हा रक्तरंजीत बीड…आणि त्याला लागलेली ही गुन्हेगारीची कीड…अशी बिकट अवस्था सध्या बीडची झालीय…

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts