Bike accident : सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर नियम धाब्यावर बसवून धोकादायक स्थितीत लावलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार शिवकुमार श्रीकांत पाटील हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला यशवंत वसंत पाटील हा गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. त्यामध्ये ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.
हेही वाचा – टिपू सुलतानची शिवाजी महाराजांशी तुलना; शाहू महाराजांच्या विधानानं नवीन राजकीय वादळ
ढवळी येथील शिवकुमार पाटील व त्याचा मित्र यशवंत पाटील हे दोघेजण रात्री दुचाकीवरून गावाकडे जात होते. तुंग येथील नर्सरीसमोर रात्री साडे नऊच्या सुमारास ट्रक आष्ट्याकडे तोंड करून थांबला होता. ट्रक रस्त्याकडेला उभा केल्यानंतर दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टरही लावलेला नव्हता. तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे तो धोकादायक स्थितीत उभा होता. त्याचवेळी शिवकुमार याला अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही.
दुचाकी ट्रकवर आदळल्यानंतर शिवकुमार याच्या डोक्याला, कपाळाला मार लागून गंभीर जखमी होऊन निपचिप पडला. तर मागे बसलेला यशवंत पाटील जखमी झाला. डॉक्टरांनी घटनास्थळी तपासल्यानंतर शिवकुमार हा मृत असल्याचे समजले. यशवंतला आष्टा येथे उपचारास नेले. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी गर्दी हटवून पंचनामा केला. शिवकुमारचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. ट्रक चालकाने रिफ्लेक्टर तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड करत केबिन पेटवून दिली. त्यामुळे काही वेळातच केबिन जळून खाक झाला.











