LIC Bima Sakhi Yojana: दहावी पास महिलांसाठी एलआयसीने खास योजना सुरू केली असून, यामधून महिलांना घरबसल्या कमाईची संधी मिळणार आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध संस्थांकडून अनेक योजना राबवल्या जातात. अशातच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) म्हणजे LIC ने महिलांसाठी ‘विमा सखी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दहावी उत्तीर्ण महिलांना प्रशिक्षणासह कमाईची संधी उपलब्ध दिली जाते.
काय आहे LIC विमा सखी योजना?
LIC विमा सखी योजना ही विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी झालेल्या महिलांना विमा पॉलिसीबाबत प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर त्या LIC च्या विमा पॉलिसी ग्राहकांना विकू शकतात.
हेही वाचा: अशोक खरात प्रकरण रुपेरी पडद्यावर; दीपाली सय्यद चाकणकरांच्या भूमिकेत झळकणार
कोण अर्ज करू शकतात?
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे वय १८ ते ७० वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार महिला किमान दहावी उत्तीर्ण असावी.
किती मिळते मानधन?
या योजनेत सहभागी महिलांना सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी निश्चित मानधन दिले जाते.
पहिल्या वर्षी – 7000 रु. प्रतिमहिना
दुसऱ्या वर्षी – 6000 रु. प्रतिमहिना
तिसऱ्या वर्षी – 5000 रु. प्रतिमहिना
याशिवाय विमा पॉलिसी विक्रीवर स्वतंत्र कमिशन देखील दिले जाते. लक्ष्यापेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या महिलांना अतिरिक्त प्रोत्साहन रक्कमही मिळू शकते.
प्रशिक्षण आणि पुढील संधी
योजनेत सहभागी महिलांना LICकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला LIC एजंट म्हणून काम सुरू ठेवू शकतात.
मात्र यासाठी एक महत्त्वाची अट आहे. महिलांनी सुरू केलेल्या पॉलिसींपैकी किमान 65 टक्के पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.






