Raj Thackeray NaMo Tourism Centers : एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील खातं पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, राजगडावर टुरिझम सेंटर उभारणार आहे. त्याला नमो टुरिझम सेंटर असे नाव देण्यात येणार आहे. तिथ केवळ आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असायला पाहिजे तिथं नरेंद्र मोदींच्या नावाची सेंटर कशासाठी? तुम्ही गडकिल्ल्यांवर सेंटर उभारूनच दाखवा, उभं केलं की फोडणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी मेळाव्यातून मनसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिला. तसेच, निवडणूक आयोग आणि केंद्र व राज्य सरकावरही तोफ डागली. तर, मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी, चाटुगिरी कारावी, असे म्हणत एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. राज्यातील मतदार यादीतील घोळ लक्षात आणून देत त्यांनी प्रेझेंटेशनही केलं. 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळलं पाहिजे. सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसही मतदारच आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या, असे राज ठाकरेंनी म्हटले.
हे ही वाचा – ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्र्यांचे बच्चू कडूंना आश्वासन
नमो टुरिझम सेंटर
एखाद्याने किती स्वाभीमान गहाण टाकायचा ह्याला काही मर्यादाच नाहीत. हे शिंदेचं खातं. ह्याचा जीआर देखील काढलाय, हे जर ऐकाल तर तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल. नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार काही टुरिझम पाँईट काढत आहेत. त्यासाठी, रायगड, शिवनेरी, राजगडावर पर्यटनाची नमो टुरिझम सेंटर काढत आहे. आमच्या महाराजांच्या किल्ल्यांवर, जिथं फक्त महाराजांचंच नाव हवं तिथं, हे उभं केलं जातंय. मी आत्ताच सांगतो उभं केलं की फोडून टाकणार. मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, खाली किती चाटुगिरी चालूय हे पंतप्रधानांनाही माहिती नसेल, असे म्हणत राज ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं.
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 30, 2025
गेली 5 वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत, आधी मतदार याद्या स्वच्छ करा. आणखी 1 वर्ष निवडणुका घेऊ नका, मतदार याद्या स्वच्छ झाल्या की घ्या. मग जर पराभव झाला तर आम्ही स्विकारतो. पण, मॅच फिक्स आहे. मुख्य निवडणुक आयोग सांगतात सीसीटिव्ही ही प्रायव्हसी आहे. मत देणं ही प्रायव्हसी असू शकते, पण मतदार ही प्रायव्हसी कशी असू शकते? जे पटत नाही, पचत नाही अशी उत्तरं ते देतात, असे म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले.
आगामी निवडणुकीत तुम्ही लक्ष नाही दिलं तर हातात केळं येणार
राज ठाकरे यांनीही पक्षाच्या मेळाव्यातून 1 तारखेच्या मोर्चाला हजर राहण्याचे आवाहन मुंबईकरांना केलं. मी स्वत: लोकलने मोर्चाला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत तुम्ही लक्ष नाही दिलं तर हातात केळं येणार, गेली अनेक वर्ष मी हे सांगतोय. लोकं आपल्याला सांगतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतात रुपांतर होतं नाही. पण, या सर्व भानगडीमुळे आपला पराभव होतो. अख्खा देश बोंबलतोय, याच पद्धतीने सत्तेत यायचं आणि हवं तसं वागायचं असे म्हणत राज यांनी विरोधकांवर टीका केली.











