Raghav Chadha: आम आदमी पार्टीसाठी मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राज्यसभेतील पक्षाचे 10 पैकी तब्बल 7 खासदार भाजपमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे राज्यसभेतील सत्तासमीकरणांमध्ये बदल होत असून भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
देशाच्या राजकारणात मोठी घडामोडी घडली असून आम आदमी पक्षाला (AAP) राज्यसभेत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते राघव चड्डा यांनी राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या सोबत आणखी सहा खासदारांनीही पक्षांतर केल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयामुळे राज्यसभेतील आपचे संख्याबळ लक्षणीयरीत्या घटले आहे. आधी 10 खासदार असलेल्या पक्षाची संख्या आता केवळ 3 वर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राघव चड्ढा यांना काही आठवड्यांपूर्वी राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आपल्या भूमिकेबाबत बोलताना चड्ढा यांनी पक्षाच्या मूळ विचारसरणीपासून विचलित झाल्याचा आरोप करत वेगळा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी 2027 मधील पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंजाब हा आपचा मजबूत गड मानला जात असल्याने या पक्षांतराचा निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच, राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदारांनी एकत्रितपणे पक्षांतर केल्यास अँटी-डिफेक्शन कायद्यापासून सूट मिळू शकते. त्यामुळे या खासदारांनी “विलीनीकरण”चा मार्ग स्वीकारल्याची चर्चा सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पुढील काही दिवसांत यावर अधिक घडामोडी होण्याची शक्यता आहे.
राघव चड्ढांसह ‘हे’ नेते करणार भाजपमध्ये प्रवेश:
राघव चड्ढा
हरभजन सिंग
विक्रमजीत सिंग साहनी
बलबीर सिंग सीचेवाल
संदीप पाठक
स्वाती मालीवाल
अशोक कुमार मित्तल








