Tehran Airport : मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणची राजधानी तेहरानमधून आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सुरु झाली आहे. इराणचं सर्वात मोठं विमानतळ, इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IKA), इथं शनिवारी सकाळी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू झाली. युद्धजन्य परिस्थितीमुळं दीर्घकाळ बंद असलेले हवाई क्षेत्र आता नागरी विमानांसाठी पुन्हा सुरू झालं आहे. या निर्णयाकडे जागतिक स्तरावर तणाव कमी होण्याचं लक्षण म्हणून पाहिले जात आहे.
हेही वाचा : राज्यसभेत आपला मोठा धक्का; राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदार भाजपमध्ये
कोणत्या शहरांसाठी पहिली विमानं रवाना :
विमानतळ अधिकाऱ्यांच्या मते, विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यापासून तेहरानमधून पहिली विमाने मस्कत (ओमान), इस्तंबूल (तुर्की) आणि मदिना (सौदी अरेबिया) साठी रवाना झाली. या विमानांमुळं अडकलेल्या प्रवाशांना केवळ दिलासाच मिळाला नाही, तर राजनैतिक वर्तुळातही याला एक महत्त्वपूर्ण बदल मानले जात आहे.
मशहद विमानतळही झालं सक्रिय :
तेहरानच्या आधी इराणचं दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या मशहद येथील विमानतळही या आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा सुरु करण्यात आलं. ईशान्य इराणमध्ये वसलेल्या या शहराला धार्मिक आणि व्यावसायिक दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. देशाच्या इतर भागांमध्ये हवाई वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे, यावरून असे दिसून येते की इराण आता आपल्या नागरी सेवा सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
जगानं सोडला सुटकेचा निःश्वास :
युद्धसदृश वातावरणात, देशाचे मुख्य विमानतळ पुन्हा सुरु होणं हे शांततेचं एक मोठं लक्षण आहे. जोपर्यंत हवाई क्षेत्र बंद राहील, तोपर्यंत मोठ्या लष्करी संघर्षाचा धोका असतो. तेहरान विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने हे सूचित होते की सुरक्षा आता पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि नागरी हवाई वाहतुकीला असलेला धोका कमी झाला आहे.










