Vijay Wadettiwar | सध्या राजकीय वर्तुळात वेध लागले आहेत ते राज्यसभा निवडणुकांचे. यापार्श्वभूमीवर आज (4 मार्च) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होणार आहे. अशातच या बैठकीअगोदर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपली मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे. राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, अशी इच्छा वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – “रिपोर्ट दारू पिऊन बनवला…”, DGCA च्या अहवालावर राष्ट्रवादीच्या आमदाराची संतप्त प्रतिक्रिया
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरेल. अद्याप कोणत्याही नावावर अंतिम निश्चिती झालेली नाहीये. पण, आजच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होईल.
आमची आग्रही मागणी होती की, राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी कारण आमचा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी. तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विधान परिषदेची जागा मिळावी, अशी इच्छा विजय वडेट्टीवारांनी बोलून दाखवली. तसेच आज तिन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते अंतिम होईल. त्याबद्दल हायकमांड अंतिम निर्णय घेईल, असंही वडेट्टीवारांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यसभेसाठी आपला उमेदवार जावा म्हणून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. या जागेसाठी ठाकरे गटातील काही नेते इच्छुक असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शरद पवारांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच आता हा पेच सोडवण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.










