Jobs after 2026: अनेक विद्यार्थ्यांनी नुकत्याच बोर्डाच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. अशा परिस्थितीत लाखो विद्यार्थी आपल्या करिअर आणि भविष्यासंदर्भात विचार करत आहेत. येत्या काळात कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या मिळतील आणि कोणत्या क्षेत्रात करिअर करणे अधिक सुरक्षित ठरेल, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहेत.प्रत्यक्षात बदलती टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल इकॉनॉमी आणि स्टार्टअप कल्चरमुळे रोजगार बाजारात मोठा बदल झाला आहे. नव्या अहवालानुसार कंपन्या आता फक्त डिग्रीपेक्षा कौशल्यांना अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये भरती वेगाने वाढत आहे, तर काही पारंपरिक नोकऱ्यांची मागणी कमी होताना दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया, 2026 नंतर कोणत्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअपमध्ये सर्वाधिक भरती
अहवालानुसार, येत्या काळात ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप क्षेत्रात सर्वाधिक भरती होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात सुमारे 8.9 टक्के रोजगार वाढ नोंदवली गेली आहे. वेगाने वाढणारी डिजिटल शॉपिंग, क्विक कॉमर्स, एआय आधारित प्लॅटफॉर्म आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचणारे इंटरनेट यामुळे कंपन्या सातत्याने विस्तार करत आहेत मात्र आता फक्त मोठ्या प्रमाणावर भरती होत नाही, तर कंपन्या कुशल उमेदवारांना अधिक प्राधान्य देत आहेत. प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, ग्रोथ मार्केटिंग आणि स्मार्ट लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मागणी झपाट्याने वाढत आहे.तज्ज्ञांच्या मते, एआय आणि डिजिटल टेक्नॉलॉजीशी संबंधित व्यावसायिकांची मागणी सर्वाधिक राहणार आहे. लिंक्डइनच्या अहवालात प्रॉम्प्ट इंजिनिअर, एआय इंजिनिअर, मशीन लर्निंग इंजिनिअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॅनेजर यांसारख्या नोकऱ्यांना सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
हेल्थकेअर आणि फार्मा क्षेत्रातही वाढत्या संधी
हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातही रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. अहवालानुसार या क्षेत्रात सुमारे 7 टक्के रोजगार वाढ दिसून आली आहे. खासगी रुग्णालयांचा विस्तार, हेल्थ इन्शुरन्सचा वाढता वापर आणि फार्मा एक्सपोर्टमध्ये झालेली वाढ ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.आता हेल्थ सेक्टर केवळ डॉक्टर आणि नर्सपुरता मर्यादित राहिलेला नाही. बायोइन्फॉर्मेटिक्स, डिजिटल हेल्थ अॅनालिटिक्स, रेग्युलेटरी अफेयर्स, टेलिमेडिसिन आणि एआय आधारित डायग्नोस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्या झपाट्याने वाढत आहेत.
मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग क्षेत्रालाही गती
भारतात मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही वेगाने प्रगती होत आहे. TeamLease च्या अहवालानुसार या क्षेत्रात 6.6 टक्के रोजगार वाढ नोंदवली गेली आहे. सरकारची PLI योजना, सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कुशल व्यावसायिकांची गरज भासत आहे.
कंटेंट क्रिएशन आणि डिजिटल मीडियामध्ये वाढत्या संधी
सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे कंटेंट क्रिएशन आणि डिजिटल मीडिया हे वेगाने वाढणारे करिअर क्षेत्र बनले आहेत. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइनसारख्या प्लॅटफॉर्ममुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.कंटेंट क्रिएटर, सोशल मीडिया मॅनेजर, डिजिटल मार्केटर, पत्रकार आणि मीडिया स्ट्रॅटेजिस्ट यांसारख्या भूमिकांची मागणी सातत्याने वाढत आहे.







