Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • वाहतूक पोलिसांनी तब्बल 1 लाख 58 हजार रुपयांचा दंड आकारला
महाराष्ट्र

वाहतूक पोलिसांनी तब्बल 1 लाख 58 हजार रुपयांचा दंड आकारला

1

बारामती, ११ सप्टेंबर २०२५  | बारामती जिल्ह्यात प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे. या वाहतूक कोंडीला आला घालण्यासाठी तसेच यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता याचा विचार करून बारामती वाहतूक शाखा अवजड वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. शहरातील बेशिस्त वाहतुकीत शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत असून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक योजनांची आखणी करण्यात येत आहे.

बारामतीतील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडून आवश्यक्तेनुसार विविध उपक्रम राबविले जातात. वाहतूक पोलिसांकडून दिनांक २७ जुलै २०२५ ते ९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेत तब्बल १५३ वाहनांवर कारवाई करून १ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे. त्यांनी व्याख्याने व शिबिरांमधून वाहन चालकांना मार्गदर्शन केले तर बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी अनेक वेळा धाडसी कारवाया केल्या.

ही कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल ,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक सुभाष काळे, वाहतूक शाखेचे पोलीस जवान प्रदीप काळे, अजिंक्य कदम, दत्तात्रय भोसले, आकाश कांबळे, प्रज्योत चव्हाण यांनी केली आहे.

दंड भरला नाही तर वाहने ताब्यात

महिनाभरापूर्वी क्षमतेपेक्षा जास्त लोड घेऊन वाहतूक करणाऱ्या 16 वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली होती. यानंतर आता डंपर, टिपर, काँक्रिट मिक्सर, मल्टी एक्सेल ट्रक, प्रायव्हेट बस अशा अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमभंग करणारी अनेक वाहने आढळली. त्यामध्ये काही टिपर वाहने थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात ताब्यात घेऊन ठेवण्यात आली. जोपर्यंत दंड भरला जात नाही किंवा कागदपत्रे सादर केली जात नाहीत तोपर्यंत ती वाहने मुक्त करण्यात आलेली नाहीत.

नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई

वाहतूक शाखेच्या पथकाने परवाना जवळ नसणे, नो-एन्ट्री झोनमध्ये प्रवेश करणे, वाहन धोकादायक स्थितीत चालविणे, वाहन विमा नसणे, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र नसणे, फॅन्सी नंबरप्लेट लावणे आदी नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. या मोहिमेत तब्बल १५३ वाहनांवर कारवाई करून १ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलिसांचे आवाहन

‘वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहन चालवताना सर्व कागदपत्रे जवळ बाळगा आणि सुरक्षितता पाळा,’ असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.

  पत्रकार – सचिन आव्हाड (बारामती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts