मुंबई : आगामी नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यासाठी केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा अशी स्पष्ट भूमिका विश्व हिंदू परिषदेनं (विहिंप) मांडली आहे. गरबा मंडपात प्रवेश करणारी व्यक्ती हिंदूच आहे, याची खात्री करण्यासाठी त्या व्यक्तीचं आधारकार्ड तपासावं आणि प्रत्येकाला टिळा लावावा अशी भूमिका विहिंपनं घेतली आहे. यासंदर्भात विहिंपच्या वतीनं ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात येत आहेत.
दांडिया खेळताना आधार कार्ड असणं आवश्यक :
धार्मिक आयोजनाचा फायदा घेत ‘लव्ह जिहाद’ पसरविला जातो, असा आरोप करीत विहिंपनं दोन वर्षांपूर्वी गरबा-दांडियाच्या मंडपात इतर धर्मीयांना प्रवेश देण्यास विरोध दर्शविला होता. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी स्वत: उपस्थित राहून अभियान राबविलं होतं. त्यावेळी अनेक ठिकाणी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी स्वत: प्रत्येकाचं आधारकार्ड तपासून आणि टिळा लावून प्रवेश दिला होता. हे अभियान यावर्षीदेखील राबविण्यात येणार असल्याचं विहिंपनं स्पष्ट केलं आहे. “आमची भूमिका स्पष्ट आहे. यंदादेखील आम्ही अभियान राबविणार आहोत. गरबा-दांडिया आयोजकांनीदेखील प्रत्येकाचं आधारकार्ड तपासून प्रवेश द्यायला हवा,” अशी भूमीका विहिंपनं घेतली आहे. त्यामुळं यंदाही दांडिया खेळणाऱ्यांना त्यांचं आधार कार्डसोबत बाळगावं लागणार आहे.
विहिंपच्या अनेक मागण्या :
राज्यात अनेक सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ तसंच खासगी आयोजक गरबा, दांडिया उत्सवाचं आयोजन करतात. या उत्सवात महिला आणि युवती मोठ्या संख्येनं सहभागी होतात. गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक अशा आयोजनांचा गैरफायदा घेत असतात. त्यामुळं गरबास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. पोलीस प्रशासनानंही सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करावी, अशीही मागणी विहिंपनं केली आहे.