बीड : आज बीडमधील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा संपन्न होत असून यावेळी पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडे देखील उपस्थित आहेत. यावेळी, पंकजा मुंडेंनी जनतेला संबोधित केले. त्यावेळी, दसरा हा केवळ मेळावा नाही, तर या साध्या साध्या माणसांचा मेळावा असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं.
घोषणा देणाऱ्या लोकांवर व्यक्त केली नाराजी
दसरा मेळाव्यात जनतेला संबोधित करताना, पंकजा मुंडेंनी घोषणा देणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी त्या म्हणाल्या,”आज सोन लुटायला,सोन्यासारखी माणसं आली आहेत. जे शांत बसले आहेत ते गोपीनाथ मुंडे यांचे, भगवान बाबांच्या विचाराचे पाईक आहेत. पण घोषणा देणारे मला वाटत नाहीत”,असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना भरघोस मदत देईल – पंकजा मुंडे
मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, त्याविषयी देखील पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. यावेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत देईल, असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिल. “या लोकांचे दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात सांगू शकत नाही. पण प्रधानमंत्री मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने शब्द देते की, शेतकऱ्यांना भरघोस मदत देईल”, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
देवीने सर्व राक्षस संपवले
सध्या जातीवादावरून आणि जात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापलं आहे. त्यामुळे,”जातीवादाचे,धर्मवादाचे राक्षस जन्मले आहेत.जातीपातीची भिंत निर्माण करणारे राक्षस समविण्याचे सामर्थ्य मला यावे.जातींना एकत्र गुंफण्याचे काम मला करायचे आहे. प्रत्येक जातीच्या माणसासाठी संघर्ष करणार आहे. पण आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
दोन घास कमी खा पण स्वाभिमान ठेवा
“भगवान बाबा काय सांगायचे की एकर विका पण शिका. मी आवाहन करते, की दोन घास कमी खा पण स्वाभिमान ठेवा. गुंड पाळू नका. चुकीचे काम करू नका, कोणासमोर झुकू नका. मी केवळ एक ट्विट केलं तर मोठी गर्दी जमली, ही दसरा मेळाव्याची परंपरा आहे”,असं म्हणत कोणी स्वाभिमान सोडू नका असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं.
मुंडे साहेबांनी दिलेला वारसा मी चालवत राहील
अकरा वर्षे अभिमान वाटावी अशी, ही यात्रा होती. सावरगाव हे भगवान बाबा यांची जन्मभूमी आहे. कोणाचा रुपया घेतला नाही. मुंडे साहेबांनी दिलेला वारसा मी चालवत राहील. तुम्हाला खाली मान घालायला लावणार नाही.