कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात पुणे पोलीस आता ऍक्शन मोडवर आली आहे. घायवळवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप झाल्याने कारवाईला उशीर झाल्याचा विरोधकांनी आरोप केलेला. त्यात घायवळ परदेशात लंडनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय संघटनेची मदत घेण्याचे ठरवले आहे. इंटरपोलने पुणे पोलिसांच्या विनंतीवरून घायवळविरोधात ब्लु कॉर्नर नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. यामुळे घायवळच्या अडचणीत भर पडली आहे.
निलेश विरोधात इंटरपोलची ब्लु कॉर्नर नोटीस (BCN)
पुणे पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने निलेश घायवळ विरोधात ब्लु कॉर्नर नोटीस जारी केली आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते. निलेश घायवळने पासपोर्टसाठी अडनावात बदल केला आणि अहिल्यानगर येथून पासपोर्टसाठी अर्ज केल्याचे समोर आले. बनावट पासपोर्ट मिळवून परदेशात पसार झाला. निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. तो भारताबाहेर असला तरी इंटरपोलच्या मार्फत भारतीय तपास यंत्रणांना त्याचा शोध घेता येईल.
इंटरपोलने अशी नोटीस काढल्यानंतर सर्व देशांच्या पोलीस आणि तपास यंत्रणांना याबद्दलची माहिती जाते. त्यामुळे या यंत्रणा एखाद्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी वा तिच्या हालचालींबद्दलची माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतात. ही नोटीस जारी झाल्यास सदस्य देशांना त्या व्यक्तीचा ठावठिकाणा सांगणे बंधनकारक असते.
ब्लु कॉर्नर नोटीस हा घायवळला भारतात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.
पासपोर्ट रद्द करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात
गुंड निलेश घायवळला अटक करायची असल्याने त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी पुणे पोलिसांनी विशेष ‘मकोका’ न्यायालयाकडे केली आहे. पुणे पोलीस निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार असल्याची पोलिस आयुक्तांनी माहिती दिली. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांशी या विषयावर चर्चा केली. तपासात असे निष्पन्न झाले की, घायवळने बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला होता. पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली होती, असे तपासातून समोर आले. बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवणे हा गंभीर गुन्हा आहे. पुणे पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या आहेत.
सचिन घायवळवर कारवाई
दुसरीकडे कोथरूड गोळीबार प्रकरणी नीलेशचा भाऊ सचिन घायवळवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे घायवळ बंधूंचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. या टोळीविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.