अहिल्यानगर : यंदा राज्यावर महापुराचं मोठं संकट ओढावलं आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडाला. विशेषतः मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसानं प्रचंड धुमाकूळ घालून अनेक कुटुंबं विस्थापित झाली आहेत. अशा कठीण परिस्थितीत शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं आपली सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढं केला आहे. “साईबाबा संस्थाननं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल 5 कोटी रुपयांची मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. यापूर्वी संस्थाननं 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीची तीव्रता आणि नागरिकांवर आलेलं संकट लक्षात घेता, संस्थाननं मदतीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
संकटाची तीव्रता लक्षात घेत मदत वाढवली
अहिल्यानगरच्या जिल्हा प्रधान न्यायाधीश तथा साईबाबा संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), संस्थान समितीचे सदस्य आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तसेच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तातडीने 1 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यातील संकटाची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेऊन, तसेच मानवतेच्या नात्यानं मदतीचा हात पुढं करत, या तिघांनी मिळून मदतीची रक्कम वाढवून 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.
पूरग्रस्तांची साई आश्रमात निवासाची सोय
एकीकडं राज्याला आर्थिक आधार देत असताना, साईबाबा संस्थाननं स्थानिक पातळीवरही माणुसकीचा धर्म जपत आपद्ग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचं कार्य केलं आहे. शिर्डी आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, ज्यामुळे अनेक कुटुंबं बेघर झाली आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी संस्थाननं साई आश्रम इथं तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली असून, संस्थानच्या प्रसादालयात भोजनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली.