चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला केला. वाघाने शरीराचे तुकडे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे शेत परिसरात विखुरलेल्या अवस्थेत सापडले.या हल्ल्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेतकरी भाऊजी पाल नेहमीप्रमाणे आपल्या बैलांना शेतात घेऊन गेले. बैलांना चारण्यासाठी मोकळे सोडले. आणि घरी परत आले.सायंकाळी ते बैलांना परत आणण्यासाठी शेताकडे गेलेत. मात्र रात्र झाली घरी परतले नाहीत. कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेत शोधाशोध केली. पण त्यांचा शोध लागला नाही.रविवाराला कुटुंबीयासह गावकऱ्यांनी शोधमोहीम पुन्हा सुरू केली. यावेळी शेताच्या परिसरात भीषण दृश्य दिसले. शेतकऱ्याच्या शरीराचे अनेक तुकडे विविध ठिकाणी विखुरलेले होते.हे दृश्य बघताच गावकरी हादरले.घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
वनकर्मचाऱ्यांनी मृतदेहाचे तुकडे गोळा केलीत. ही घटना अतिशय दुर्दैवी असून अशा प्रकारे शरीराचे तुकडे विखुरले जाण्याची घटना या भागात पहिल्यांदाच घडली आहे.सदर परिसरात वनविभागाने पथक तैनात केले आहे.वाघाचा शोधघेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरातील गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गोंडपिपरी तालुक्यात याआधी वाघाच्या हल्ल्याची अशी घटना समोर आली नव्हती. मात्र आता या घटनेनंतर शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक गावांमध्ये लोक शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत.
सध्या सोयाबीन,कापूस, धान शेतात उभे आहे.शेतकऱ्यांना शेतात रोजच जावे लागते.ही घटना घडल्याने शेतात काम करायला शेतमजुर घाबरत आहेत.जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.गोंडपिपरीसारख्या ग्रामीण भागात बऱ्याच वर्षांपासून वाघाच्या घटना घडलेल्या नव्हत्या. या घटनेमुळे शेतकरी समुदाय अस्वस्थ झाला आहे.