spice market impact due to war : अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील युद्धाची (America, Israel – Iran War) ठिणगी साता समुद्रपार पडली असली, तरी त्याचे चटके आता थेट भारताच्या ‘किचन’पर्यंत आणि व्यापाऱ्यांच्या (Small Traders in Trouble) ‘खिशा’पर्यंत पोहोचलेत. ज्या भारतीय मसाल्यांनी (Indian spices) जगाची चव वाढवली, त्याच मसाल्यांचा सुगंध आता युद्धाच्या धुरामुळे कोंडला गेलाय!
भारतात मसाल्यांच्या उत्पादनात जवळपास साडेचार हजार कंपन्या रात्रंदिवस काम करतात. यातील ८० टक्के कंपन्यांचा डोलारा हा केवळ ‘एक्सपोर्ट’वर अवलंबून आहे. पण आज हेच निर्यातीचे दरवाजे युद्धामुळे बंद झालेत.
हेही वाचा – इराण–अमेरिकेतील चर्चा अयशस्वी; तणाव पुन्हा टोकाला, युद्ध पेटणार?
भारतात मसाल्याच्या ४,५०० कंपन्या
भारतात मसाले निर्मिती करणाऱ्या जवळपास ४,५०० छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने स्थानिक बाजारात आवक वाढली आणि दर कोसळले. पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकचाही मोठ्या तुटवडा होत असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे.
मसाल्यांची मोठी बाजारपेठ ‘आखाती देश’
भारतीय मसाल्यांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे ‘आखाती देश’. एकूण निर्यातीपैकी तब्बल ५० टक्के माल दुबई, सौदी आणि इराणमध्ये जातो. पण युद्धामुळे जहाजांचे मार्ग रोखले गेलेत आणि ऑर्डर्स रद्द झाल्यात. परिणामी, जो माल परदेशात जाणार होता, तो आता भारतातच पडून आहे. बाजारात आवक वाढल्यानं दर मातीमोल झालेत, तर दुसरीकडे पॅकिंगसाठी लागणारं प्लास्टिक मिळेनासं झाल्यानं उत्पादन खर्च दुपटीने वाढलाय!
छोटे उद्योजक युद्धाच्या आगीत होरपाळले
हजारो छोटे-मोठे उद्योजक आज या युद्धाच्या आगीत होरपळून निघत आहेत. जो मसाला देशाला परकीय चलन मिळवून द्यायचा, तोच मसाला आज व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय. युद्धाच्या झळा केवळ सीमांवरच बसत नाहीत, तर त्या सामान्य माणसाच्या पोटाला आणि उद्योगाच्या कण्यालाही कशा बसतात, याचं हे जळजळीत उदाहरण आहे.












