ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिवंडी परिसरात गरीब आणि वनवासी बांधवांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करणाऱ्यांचे मोठे रॅकेट बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले आहे. यावेळी, अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होत मोठा कट उधळला. याप्रकरणी, पोलिसांनी एका अमेरिकन नागरिकासाह एकूण 3 जणांना अटक केली आहे.
काय घडलं नेमकं?
हा संपूर्ण प्रकार 3 ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील भुईशेत, चिंबी पाडा या ठिकाणी उघडकीस आला. धर्मांतराचे काम करणारा जेम्स वॉटसन हा अमेरिकन नागरिक त्याच्या स्थानिक साथीदारांसोबत अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देण्याचा कार्यक्रम आयोजित करत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच, बजरंग दलाचे कार्यकर्ते संदीप भगत आणि दादा गोसावी यांनी स्थानिक पोलिस पाटलांच्या मदतीने घटनास्थळी ठिकाणी धाव घेतली. भुईशेत गावात मनोज गोविंद कोल्हा यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत हा प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोपी हिंदू धर्मातील देवी-देवतांवर आणि रुढी-परंपरांवर टीका करत असल्याचं, तसेच मंतरलेले तेल लावल्यास आणि येशूची प्रार्थना केल्यास आजार बरे होतात, असे सांगून गोरगरीब वनवासी बांधवांना धर्मांतरासाठी आमिष दाखवले जात असल्याचे समजले आहे. याशिवाय आरोपींकडे ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराचे मोठ्या प्रमाणावर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे (पश्चिम) येथील हिरानंदानी इस्टेट येथे राहणारा मूळ अमेरिकेचा नागरिक असलेल्या 58 वर्षीय जेम्स वॉटसन याच्यासह साईनाथ गणपती सर्पे आणि मनोज गोविंद कोल्हा हे गावात महिला, पुरुष आणि मुलांना प्रार्थना करण्यासाठी, धार्मिक पुस्तकांमधून वाचन करण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेसाठी एकत्र करण्याचे काम करत होते. यातील जेम्स वॉटसन हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधारअसल्याचे बोलले जात आहे. तो सन 2016 मध्ये टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता आणि नंतर बिझनेस व्हिसा मिळवून भारतातच राहून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये धर्मांतराचे काम करत होता. दरम्यान, कोणताही अधिकृत व्यवसाय न करता तो अनेक वर्षांपासून हे काम करत असल्याचा आरोप संदीप भगत यांनी केला.
या घटनेची माहिती स्थानिक रहिवासी रविनाथ सावजी भुरकुट यांनी हिंदुत्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर घटनेची खात्री झाल्यावर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत घटनास्थळावरून साईनाथ गणपती सर्पे, जेम्स वॉटसन आणि मनोज गोविंद कोल्हा यांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. तिघांविरुद्ध महाराष्ट्र मानवी बलिदान आणि इतर अमानवी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक आणि निर्मूलन कायदा आणि परदेशी कायदायासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.